आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील घरकुल योजनेतील अडचणीचा तिढा सुटणार

0
397
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
            कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन्ही पंचायत समित्या, कर्जत नगरपंचायत तसेच जामखेड नगरपरिषद यांच्या नियोजनातून होणाऱ्या घरकुल योजनांच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नुकत्याच बैठका घेतल्या.गृह निर्माण कार्यालयात पार पडलेल्या पहिल्या बैठकीत राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख राजाराम दिघे यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे गटविकासाधीकारी अमोल जाधव, दिलीप जाधव,जामखेड पंचायत समितीचे गटविकासधिकारी परशुराम कोकणी, सुर्यकांत मोरे मान्यवरही उपस्थित होते.
     आ.रोहित पवारांनी ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेबाबत येत असलेल्या अडचणी उपस्थित केल्या.या योजनेंतर्गत ‘ड’ यादीत अनेक लाभार्थी कुटुंबे होती. मात्र सर्वेक्षणात अनेक चुकीच्या घटकांची नोंदणी करताना अनेक लाभार्थी कुटुंबे वगळण्यात आले. वाहने, टेलिफोनसारख्या सुविधांचा सर्वेक्षणात सामावेश करून कुटुंबांना अपात्र करण्यात आले. अशा कुटुंबांना पात्र करण्यासाठी ऑनलाइनला स्वतंत्र विंडो मिळावी,वगळलेल्या लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करून घेण्यात यावे, शासनस्तरावरून याबाबत फेर सर्वेक्षण करण्यात यावे, ज्या कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा कुटुंबांना ‘यशवंत मुक्त वसाहतमध्ये समुहाने घरकुल बांधण्यास जागा उपलब्ध करण्यात यावी अशी यावेळी सकारात्मक चर्चा झाली.केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्यशासनाला विनंती केली असल्याचे दिघे म्हणाले.रमाई आवास योजनेबाबतही चर्चा करत समाजकल्याण विभागाकडे आणखी वाढीव उद्दिष्ट मागवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
          तर गृहनिर्माण भवन येथे म्हाडाच्या कार्यालयात मुख्य अभियंता यांच्या दालनात घेण्यात आलेल्या बैठकीत शहरी भागातील घरकुल योजनेच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.या बैठकीत महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुनिल जाधव,कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव,जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते आदी उपस्थित होते. घरकुल लाभार्थ्यांना आत्तापर्यंत १ लाख ६० हजार रक्कम प्राप्त झाली आहे उर्वरीत ९० हजार रक्कम मिळणे बाकी आहे ही रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करणे,ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही त्यांनी काही कारणास्तव बांधले नाही अशा लाभार्थ्यांना प्रोत्साहित करणे,गरजू कुटुंबांचे घरकुल यादीत नाव समाविष्ट करून घेणे,ज्यांना घरकुल मंजुर आहे मात्र जागेअभावी ते बांधता येत नाही अशा लाभार्थ्यांना सरकारी जागेत एकत्रितपणे कसे बांधता येईल?यावरही चर्चा झाली.रमाई आवास योजना,शबरी आवास योजना,आदिवासी आवास योजना आदी योजना सुरू करायच्या आहेत यामध्ये रमाई आवास योजनेचे काम सुरु झाले आहे यासाठी समाजकल्याण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.कर्जत नगर पंचायतीकडे सध्या रमाईसाठी २४९ नागरिकांचे अर्ज दाखल झाले प्रत्येकी अडीच लाखांचा निधी नगरपंचायतकडे लवकरच जमा होणार आहे.त्यामुळे घरकुल योजनांच्या अडचणींचा तिढा आता लवकरच सुटणार आहे.
*प्रतिक्रिया🪶:*
“यापुर्वी या विषयात व्यक्तिगत लक्ष न घातल्याने गोरगरीब,गरजू कुटुंबे मदतीपासुन वंचित राहिली.यापुढील काळात त्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील.अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतानाही त्यांना सुविधेच्या चौकटीत बसवून अपात्र करण्यात आले.मात्र अशा कुटुंबांचे काही अंशी निकष बदलून त्यांना योजनेत सामाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे”
                      – आ.रोहित पवार
  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here