पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही – प्रा. राम शिंदे

0
206
जामखेड न्युज – – – – 
     प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थक नाराज होणं स्वाभाविक आहे. पण पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही, असा विश्वास भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
       पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केल्याने त्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी “जामखेड न्युज” शी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता फेटाळून लावली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवला. काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांनी राज्यात मोठं काम केलं. त्यामुळे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यातही प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा निवडून आल्या तर भागवत कराड एका वर्षापूर्वीच खासदार झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आपला निर्णय जाहीर करतील. पण पंकजा मुंडे या वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही, असं शिंदे म्हणाले.
नाराजी व्यक्त होणं स्वाभावीक
आपल्या मनासारखा निर्णय झाला नाही तर आपण घरात देखील नाराजी व्यक्त करतो. सध्या देवेंद्र फडणवीस राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यामुळे घरच्या कारभाऱ्याकडे नाराजी व्यक्त होणं स्वाभाविक आहे. पण त्यातून मार्ग निघेल, असंही ते म्हणाले.
वरळीत मोठी गर्दी
दरम्यान, भाजपचा निषेध म्हणून पदांचा राजीनामा देणारे पंकजा समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळीच घोषणा देत पंकजा समर्थकांनी वरळी गाठली. या समर्थकांनी वरळीतील पंकजा मुंडे यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे. मुंडे भगिनींना सातत्याने डावलण्यात येत असून त्याचा निषेध म्हणून आम्ही राजीनामे दिले आहेत, असं या समर्थकांनी सांगितलं. तर, पंकजा मुंडे या समर्थकांची नाराजी दूर करून त्यांना राजीनामा मागे घेण्यास सांगणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा यांच्याकडून समर्थकांना सबुरीने घेण्याचा सल्लाही दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक राजीनामे
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. मागील तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात 14 जिल्हा परिषद सदस्य, 35 पंचायत समिती सदस्य, 40 नगरसेवक, 16 बाजार समिती सदस्य, बीड जिल्ह्यातील भाजपचे 11 मंडळ अध्यक्ष या शिवाय शिरूर पंचायत समिती उपसभापतींसह केज, पाटोदा आणि गेवराई येथील पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. बीडपाठोपाठ नगरमधील पंकजा समर्थकांनीही राजीनामे दिले आहेत.
      नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर काल जामखेड तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर सह 45 /पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here