जामखेड न्युज——
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती सोहळा शुक्रवार दि.31 मे 2024 रोजी सकाळी 11 वा. श्रीक्षेत्र चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार आहे, या सोहळ्याचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी निमंत्रण दिले आहे.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, महादेव जानकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जामखेड न्युजशी बोलताना आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे जन्मस्थळ आहे. दरवर्षी या ठिकाणी 31 मे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून विविध विकास कामांमुळे चौंडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी जयंती उत्सवास विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नामवंत, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यासह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. यंदाच्या जयंती सोहळ्यापासून त्रिशतकीय जयंती उत्सवास प्रारंभ होत असल्याने यंदाच्या कार्यक्रम विशेष असणार आहे.
या सोहळ्यास खा.डॉ.सुजय विखे, खा.सदाशिव लोखंडे, आ.बबनराव पाचपुते, आ.बाळासाहेब थोरात, आ.शंकरराव गडाख, आ.प्राजक्त तनपुरे, आ.मोनिकाताई राजळे, आ.संग्राम जगताप, आ.निलेश लंके, आ.अशुतोष काळे, आ.लहुजी कानडे, आ.सत्यजित तांबे, आ.रोहित पवार, आ.डॉ.किरण लहामटे आदि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
तसेच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, खा.विकास महात्मे, आ.दत्तात्रय भरणे, आ.गोपीचंद पडळकर, आ.नारायण पाटील, आ.प्रकाश शेंडगे, आ.अनिल गोटे, आ.अनंतकुमारपाटील, आ.पोपटराव गावडे, आ.रमेश शेंडगे, आ.नानाभाऊ कोकरे, आ.हरिभाऊ भदे, आ.रामहरी रुपनवर, आ.रामराव वडतुके, आ.विजयराव मोरे आदि राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.
चौंडी भारताच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले गाव. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान. कर्जत जामखेड रोडवर चौंडी हे ठिकाण आहे. याच महामार्गावरून जाताना आपल्याला उंच पुतळा नजरेस पडतो. तो पुतळा आहे अहिल्यादेवी होळकर यांचा. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या बागेत आपल्याला राशीचक्राचे माहितीफलक आणि १२ राशींचे प्रतिकात्मक पुतळे दिसतात. येथील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यावर नतमस्तक होण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी अनेक अनुयायी येत असतात. या पुतळ्याच्या मागच्या बाजूस त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे शिल्प कोरले आहे. चौंडीतून वाहणाऱ्या सिना नदीने गावची शान वाढवलीये.
ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे ते ठिकाण चौंडीकरांनी वारसास्थळ म्हणून जतन केलेले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिनी ज्या वाड्यात त्यांचा जन्म झाला त्या पवित्र आणि प्रेरणादायी वास्तूचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे अनुयायी येत असतात. चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमांतून राज्य सरकारकडून 1995 सालापासून विकास केला जात आहे.