जामखेड न्युज——
साकतमधील सप्ताहामध्ये गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले यांची किर्तन सेवा संपन्न
प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास आज गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले यांची किर्तन सेवा संपन्न झाली यात त्यांनी संतांच्या काळाविषयी सविस्तर माहिती सांगितली यावेळी गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कीर्तनासाठी पुढील अभंग घेतला होता.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।माझिया सकळा हरीच्या दासा।।
कल्पनेची बाधा ना हो कोणे काळी।ही संत मंडळी सुखी असो।।
अहंकाराचा वारा ना लागो राजसा। माझ्या विष्णुदासा भाविकांसी।।
नामा म्हणे तया असावे कल्याण।ज्या मुखी निधान पांडुरंग।।
नामदेवराय महाराज म्हणतात, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥ हे पंढरीनाथा, पांडूरंगा त्या कुळांचं आयुष्य आकल्प असू दे ज्या कुळांमधून भगवत् भक्त जन्माला आले आणि जे दास झाले माझ्या हरिचे.. अशा भक्ताचं रक्षण करण्यासाठी कल्याण, हित व उध्दार करण्यासाठी मी ही मागणी तुमच्याकडे करतो आहे. ती कुळं कधीही नाश पावणार नाहीत ? नष्ट होणार नाहीत ? किंबहुना त्या कुळांचा कधीही क्षय होणार नाही.
संत तुकोबा, संत चोखोबा, संत सावता महाराज, संत जनाबाई, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय आदिंनी देवा तूझी भक्ती केली ते मोक्षमार्गाला जातीलही, परंतु ते ज्या कुळात जन्मले ते कुळ किती पवित्र आहे ? हे अबाधित राहिले पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीक। तयाचा हरिख वाटे देवा ॥ देवालाही अशी कुळं आवडतात, हे कुळ उध्दरणाबाबतचे सप्रमाण उदाहरण आहे. या संतांना कल्पनेची बाधा देखील होऊ नये असे मला तुझ्याकडून मागणे मागायचे आहे. संपूर्ण विश्वासाठी जगाच्या कल्याणासाठी मागणी मागतांना संत वृत्तीच्या माणसांसाठी नामदेवांनी मागणीपर अनेक अभंगाची रचना केली. हे अभंग नितांत सुंदर आहेत.
सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भागवतकथा, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, भागवतकथा हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.
जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. ३ पासून सुरू झाला आहे. व बुधवार दि. १० रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा होईल. आज मंगळवार दि. ९ रोजी गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे किर्तन झाले. उद्या
बुधवार दि. १० रोजी हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.
सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे होते.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप गणेश महाराज काळवणे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, ३ ते ५.३० भागवतकथा, ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ किर्तन नंतर गाव जेवन त्यानंतर हरिजागर होईल.
तसेच बुधवार दि. १० रोजी सकाळी ९ ते ११ हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संयोजक हभप भिमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर असतील.
गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, अमोल महाराज चाकरवाडी, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे आहेत.