जामखेड न्युज——
संतांच्या संगतीचे जीवनात अनेक लाभ – हभप वर्षाताई महाराज काळे
साकतमधील सप्ताहामध्ये वर्षाताई महाराज यांची किर्तन सेवा संपन्न
प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास चौथ्या दिवशी हभप वर्षाताई महाराज बीड यांची किर्तन सेवा संपन्न झाली यात त्यांनी संतांच्या संगतीची महती सांगितली. यावेळी गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी कीर्तनासाठी पुढील अभंग घेतला होता.
बरवें देशाउर झालो । काय बोले बोलावे ॥१॥
लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥
भाग्यें झाली संतभेटी । आवडी पोटीं होती ते ॥२॥
तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥
अर्थ
संत संगतीचा व्यवहार हा उत्तम आहे,तो शब्दाने काय सांगावा?मनुष्य देह मिळाला हा लाभ झाला,त्यानंतर संतांचे दर्शन झाले हा दुसरा लाभ अशाप्रकारे लाभाने लाभ वाढतच गेला दुप्पट झाला,या सर्वांन मुळे जीव सुखावला हा तीसरा लाभ झाला मला संतांच्या भेटीची ओढ होती.ती भेट मोठ्या भाग्याने घडून आली. तुकाराम महाराज म्हणतात आज पर्यंत मी परमार्थाचा जो श्रम केला,तो सफल झाला.
सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भागवतकथा, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, भागवतकथा हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.
जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. ३ पासून सुरू झाला आहे. व बुधवार दि. १० रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा होईल. आज रविवार दि. ७ रोजी सौ. वर्षाताई महाराज काळे बीड यांचे किर्तन झाले.
उद्या सोमवार दि. ८ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज पवने आळंदी
मंगळवार दि. ९ रोजी गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ
बुधवार दि. १० रोजी हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.
सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप गणेश महाराज काळवणे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, ३ ते ५.३० भागवतकथा, ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ किर्तन नंतर गाव जेवन त्यानंतर हरिजागर होईल.
तसेच बुधवार दि. १० रोजी सकाळी ९ ते ११ हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संयोजक हभप भिमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर असतील.
गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, अमोल महाराज चाकरवाडी, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे आहेत.