जामखेड न्युज——
विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी डॉ भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला
विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉ. भास्कर मोरे याचा आज दि १८ रोजी दाखल केलेला जामिन अर्ज जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डॉ भास्कर मोरेच्या अडचणी वाढत आहेत. सध्या मोरे हा वन्य प्राणी पाळल्या प्रकरणी वनविभागाच्या कस्टडीत आहे.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याचे विरोधात मंगळवार दि ५ मार्च पासून कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर दि ७ मार्च रोजी विद्यार्थींच्या मागण्यांसाठी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे देखील उपोषणास बसले होते. सदरचे उपोषण व आंदोलन हे अकरा दिवस चालले होते.
डॉ. मोरे याच्या विरोधात दि ८ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेने दि १३ रोजी अटक करून जामखेड पोलीसांच्या ताब्यात दिले होते. त्यानुसार जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा डॉ भास्कर मोरेस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
यानंतर हरीण पाळल्या प्रकरणी डॉ भास्कर मोरेला वनविभागा कडुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंबधात अटक केली होती. वनविभागाची चार दिवसांची दि २० पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. आज दि १८ रोजी आरोपीच्या जामिन अर्जावर मुळ फीर्यादीच्या वतीने ॲड सुमीत बोरा व ॲड अमोल जगताप तसेच सरकारच्या वतीने सरकारी वकील ॲड. संदीप नागरगोजे यांनी बाजु मांडताना न्यायालया समोर सांगितले की आरोपी भास्कर मोरे याने केलेला गुन्हा सामाजिक व्यवस्थेवर अघात करणारा असुन समाज्यातील दुर्बल घटकावर अत्याचार करणारा आहे.
सदर आरोपी फरार होण्याची दाट शक्यता आहे तसेच सदर आरोपी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी बाजु मांडली. त्यानंतर न्यायालयाने वरील सर्व बाबींचा विचार करून व फीर्यादीच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जामखेड न्यायालयाने आरोपी भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला. त्यामुळे भास्कर मोरेच्या कोठडीत मुक्काम वाढला आहे.