जामखेड न्युज——
जामखेडमध्ये संत तुकाराम महाराज बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
सप्ताहामध्ये गीत रामायण कार्यक्रम
जामखेड शहरातील श्री विठ्ठल मंदिर येथे जगद्गुरु तुकोबाराय यांचा बीजोत्सव, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती निमित्ताने गीत रामायण अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा तसेच गीत रामायणासाठी प्रसिद्ध गायक असणार आहेत तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जामखेडचे पारमार्थिक वैभव असणारे विठ्ठल मंदिर येथे, गेल्या ३६ वर्षापासून श्रीमद् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन सोहळा अर्थात बीजोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर काही वर्षापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असा हा भक्ती आणि शक्ती चा सोहळा जामखेडकर मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
यावर्षी या कार्यक्रमात गीत रामायण आयोजित करण्यात आले आहे. ग. दि. माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीतरामायण गेली अनेक दशके सर्वच चाहतांच्या मनात घर करून राहिले आहे. अजरामर असलेली ही संगीतमय कलाकृती त्याच धर्तीवर गायक प्रसाद शेटे जामखेड येथे सादर करणार आहेत. त्याचबरोबर हरिभाऊ काळे, सुरेखा नन्नवरे, सुनीता पोकळे, प्रणव देशपांडे, ओम नन्नवरे, ओमप्रकाश नन्नवरे, पंढरीनाथ महाराज राजगुरू ही मंडळी त्यांना साथ संगत करतील. ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सर व आदर्श शिक्षक मनोहर इनामदार सर हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत एकूणच हा गीत रामायणाचा कार्यक्रम जामखेड शहरातील श्रोत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
श्रीविठ्ठल मंदिर येथे फाल्गुन शु. ११ बुधवार दि. २० मार्च ते फाल्गुन कृ. ४ गुरुवार दि. २८ मार्च या कालावधीत भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, गाथा पारायण, गाथा भजन, निष्ठावंत वारकरी ज्ञानी महापुरूषांची कीर्तने असे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
२० मार्च रोजी दुपारी चार ते साडेपाच ह.भ.प. श्री. विजय महाराज बागडे सर संत तुकाराम महाराज यांचे चरित्र सांगतील २१ मार्च रोजी छत्रपती श्री. शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज या विषयावर प्रा. शत्रुघ्न कदम सर यांचे व्याख्यान होईल तिथून पुढे २२ मार्चपासून २७ मार्चपर्यंत दररोज दुपारी चार ते साडेपाच या वेळेत गीत रामायण या संगीत कलाकृतीचा सर्व श्रोत्यांना लाभ घेता येईल.
सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी २० मार्च रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजता ह.भ.प. श्री. विजय महाराज बागडे सर यांचे कीर्तन होईल. त्यानंतर २१ मार्च ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवने, २२ मार्च सतीश महाराज उरणकर पाटोदा, २३ मार्च अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, २४ मार्च राम महाराज डोंगरे जाटनांदूर, २५ मार्च बबन महाराज बहिरवाल मदन महाराज संस्था कडा, २६ मार्च सतीश महाराज कदम भूम यांची किर्तने होतील.
बुधवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. गोविंद महाराज जाटदेवळेकर यांचे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळा अर्थात बिजोत्सवाचे कीर्तन होईल. व नंतर पुष्पवृष्टी होईल. सायंकाळी दत्ता महाराज हुके परांडा यांचे कीर्तन होईल गुरुवार दिनांक २८ मार्च रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत दत्ता महाराज हुके यांचे काल्याचे किर्तन होईल.
त्यानंतर दिलीप बाफना आणि परिवार यांच्या वतीने असणाऱ्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. तरी या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु श्री संत तुकाराम सेवा मंडळाच्या वतीने व विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे