जामखेड न्युज——
शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी, मोदी आवास योजनेचा लाभ घ्यावा- प्रशांत शिंदे
जवळा व गोयाकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी आपलं क्षेत्र कसे ओलिताखाली आणता येईल, यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून चार लाख रुपये अनुदानावर सिंचन विहिरीचा तसेच मोदी आवास योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जवळा ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रशांत शिंदे यांनी केले.
सर्वासांठी घरे २०२४ हे राज्यशासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता राज्य शासनाच्या कोणत्याही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहत आहेत. असे शिंदे यांनी सांगितले. म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे शिंदे यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर आणि फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. सिंचन विहिरीसाठी चार लाख रु तर फळबाग साठी दीड ते दोन लाख रु अनुदान दिले जाते. त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिर, मोदी आवास योजना,फळबाग लागवड, कांदा चाळ, शेततळे अश्या अनेक योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे शिंदे यांनी सांगितले.
चौकट:
ओबीसी समाजातील बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मोदी आवास घरकुल योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी प्राधानमंत्री आवास योजना ड यादीत नावे असलेल्या लोकांनी तसेच यशवंत (धनगर आवास योजना) अर्ज केलेले लाभार्थी यांनी दुबार अर्ज करू नये. ओ.बी.सी जातीचा दाखला, जागेचा उतारा, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयिकृत बँक) या परिपूर्ण कागदपत्रासह सदर प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा असे सरपंच सुशील आव्हाड यांनी सांगितले.