जामखेड न्युज——
धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका – माजी आमदार नारायण मुंडे
धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करीत असूनही प्रत्येक सरकारांनी या समाजाला फसविण्याचे पाप केले. आता राज्यकर्त्यांनी धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहाता तातडीने आरक्षण अमलबजावणी करावी,अशी मागणी माजी आमदार नारायण मुंडे यांनी चौंडी येथील उपोषणस्थळावरुन केली.
दरम्यान धनगर आरक्षण अमलबजावणीसाठी दिलेल्या पन्नास दिवसाची मुदत संपल्यानंतर यशवंत सेनेने चौंडी येथे दुसर्यांदा सुरु केलेल्या उपोषणस्थळी आज अनेक मान्यवरांसह धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनास पाठींबा जाहीर दिला
यावेळी उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले.सुरेश बंडगर,यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील,प्रदेश मुख्य सचिव नितीन धायगुडे,स्वप्निल मेमाणे, अँड विक्रमसिंह पाटील, किरण धालपे,बाळा गायके तसेच परमेश्वर वाघमोडे(माजलगाव) राजेंद्र थोरात(हिंगणगाव,ता.हवेली) मंगलताई दांगडे पाटील,अवधूत दांगडे पाटील(बारामती) यांसह विविध तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले की धनगर आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही.
महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षण अमलबजावणीचा शब्द न पाळल्याने यशवंत सेनेने चौंडी(ता.जामखेड) येथे सुरु केलेल्या दुसर्या टप्प्यातील उपोषण आंदोलनाला उस्फूर्त पाठींबा मिळत आहे. आज अनेक मान्यवरांसह धनगर समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने भेट देऊन पांठिबा मिळत आहे.
यशवंत सेनेच्या वतीने सप्टेंबर महीन्यातील 21 दिवसाच्या उपोषणाची सांगता करताना शासनाने 50 दिवसात धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अमलबजावणी करण्याचे लेखी पत्र दिले होते. दुर्दैवाने संपलेल्या पन्नास दिवसात शासनाने काहीच कृती केली नाही. यामुळेच यशवंत सेनेने पुन्हा आमरण उपोषण चौंडी येथे सुरु केले आहे.
आज दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यातून अनेक मान्यवर समाजबांधव तसेच विविध पदाधिकारी यांनी भेट देत जाहीर पांठिबा दिला.