जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात आतापर्यंत सापडल्या कुणबीच्या 8802 नोंदी
साकत सर्कलमध्ये सर्वात जास्त कुणबी नोंदी
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चांगलाच तापला आहे. नगर जिल्ह्यात कुणबीच्या नाेंदी शाेधण्यासाठी युद्धपातळीवर माेहीम सुरू आहे जामखेड तालुक्यात आतापर्यंत सात सर्कल मध्ये 8802 कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. आणखी काम सुरूच आहे. आणखी अनेक घरात कुणबीच्या नोंदी सापडण्याचा अंदाज प्रशासनाला आहे. सर्व शासकीय विभागात याबाबतची माहिती जमा करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत हा आकडा अंतिम होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाला आहे.
जामखेड तालुक्यात सर्वात जास्त साकत सर्कल मध्ये मराठीतील 1004 व मोडीतील 2471 अशा एकुण 3475 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
जामखेड तालुक्यातील नोंदी शोधण्यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या अध्यक्षतेखाली नोंदी शोधण्याचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. आतापर्यंत जामखेड तालुक्यातील सात सर्कलमध्ये पुढील प्रमाणे नोंदी सापडल्या आहेत.
पुढील प्रमाणे सर्कलवार नोंदी सापडल्या आहेत.
जामखेड सर्कल एकुण गावांची संख्या 9
मराठीमध्ये 1159 नोंदी आढळून आल्या आहेत.
साकत सर्कल गावे 12
मराठीतील नोंदी 1004 तर मोडीतील नोंदी 2471
एकुण 3475
अरणगाव सर्कल गावे 14
मराठीतील नोंदी 341
पाटोदा सर्कल गावे 15
मराठीतील नोंदी 824
नान्नज सर्कल गावे 12
मराठीतील नोंदी 557
खर्डा सर्कल गावे 13
मराठीतील नोंदी 1314
नायगाव सर्कल गावे 12
मराठीतील नोंदी 1132
अशा प्रकारे मराठीतील एकुण नोंदी 6327 तर मोडी भाषेतील एकुण नोंदी 2471 एकुण नोंदी 8802 नोंदी सापडल्या आहेत आणखीही नोंदी शोधण्याचे युद्धपातळीवर काम सुरूच आहे आणखी नोंदी सापडतील असा अंदाज आहे.
आरक्षणावरून मनोज जरांगेंनी केलं सर्वात मोठं विधान
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी कुणबी नाेंदीची शाेध मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर नगर जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विभाग व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामार्फत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला आहे. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगर पालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दोन दिवसात प्राथमिक शाळांमधील ११ लाख १४ हजार ९५८ शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील नोंदणी तपासल्या आहे. यात ४ हजार ११ जणांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. तर जात प्रमाणपत्र वैधता विभागाने ५२ हजार ६७७ जणांना कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत ५६ हजार ६८८ जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. यासह महसूल, पोलीस यंत्रणा, खरेदी दस्तावेज, नगर शहरातील वस्तूसंग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंदीच्या रेकॉर्ड यांचा शोध घेण्यात येत असून सर्व शासकीय विभाग कुणबी नोंदी शोधण्यासाठी कामाला लावण्यात आले आहेत.