ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन;वारकरी संप्रदायावर मोठा आघात

0
422

जामखेड न्युज——

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन; वारकरी संप्रदायावर मोठा आघात

प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणुन जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्याचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात. आज त्यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं आहे.


बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरुळ येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजल्यानंतर नेरुळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबामहाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर उद्या संध्याकाळी पाच वाजता नेरुळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबामहाराज सातारकर यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती.

वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे – नीळकंठ ज्ञानेश्वर अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.

आपल्या अनोख्या कीर्तनशैलीने वारकरी संप्रदायाचे विचार त्यांनी घराघरात पोहोचवले. श्रीविठ्ठलाचं कीर्तन आणि ज्ञानेश्वरीतील विचारधारा बाबामहाराजांनी सामान्यांपर्यंत अत्यंत सामान्य भाषेत पोहोचवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाबामहाराजांचं नाव पोहोचलं आहेच, पण त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनाचे देशविदेशातही चाहते आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम कमी झाले होते, परंतु त्यांचा नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here