जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेडची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका प्रयत्नाला यश आले आहे. त्यानुसार मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या असून आज (सोमवार) त्यांचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सुमारे ४० रुग्णवाहिका मिळाल्या असून याबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.
आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक वेगवेगळे निर्णय घेतले. मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवण्यापासून तर आवश्यक उपकरणे पुरवणे, औषधे पुरवणे, मनुष्यबळ पुरवणे यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन्ही तालुक्यात अद्ययावत कोविड सेंटर सुरू केले. आता त्यांच्याच प्रयत्नांतून मतदारसंघासाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत तीन तर राज्य शासनामार्फत मिळालेल्या दोन रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रोहित पवार हे पूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि जिल्हा परिषदेमार्फत रुग्णवाहिका देण्याची संकल्पना पुणे जिल्हा परिषदेने राबवली होती. हीच संकल्पना नगर जिल्हा परिषदेतही राबविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केले. त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर साहेब आणि इतर सदस्य यांना ही संकल्पना सांगितली. त्यांनाही ती पसंत पडल्याने पालकमंत्र्यांनी त्यासाठी निधीचे नियोजन केले आणि आज संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका मिळाल्या. हे पालकमंत्री, नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रयत्नांचे यश आहे. इतर ठिकाणी एखादी चांगली योजना असेल तर लोकांच्या हितासाठी ती आपल्या जिल्ह्यातही राबवणे तितकेच महत्त्वाचे असते, हे नगर जिल्हा परिषदेने दाखवून दिले. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही आणखी एक रुग्णवाहिका मिळाली आहे.
कोरोनाच्या दोन्हीही लाटेत सरकारी रुग्णवाहिकांची खूप मोठी मदत झाली, मात्र अनेक रुग्णवाहिका जुन्या झाल्याने त्यांच्या जागी नवीन रुग्णवाहिका मिळाल्या तर रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य होईल. त्यासाठी या रुग्णवाहिका उपयोगी पडतील.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आमदार रोहित पवार यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दोन आणि आमदार निधीतून एक अशा तीन रुग्णवाहिका यापूर्वी दिल्या आहेत. त्यांचा खूप मोठा फायदा मतदारसंघाला झाला. आता आणखी पाच आणि सामाजिक संस्थेमार्फत एक अशा एकूण नऊ रुग्णवाहिका कर्जत-जामखेड मतदारसंघाला मिळाल्या आहेत. यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली तर या रुग्णवाहिकांचा रुग्णांसाठी खूप मोठा फायदा होईल.
*कोट*
मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर साहेब यांनी
मोठे सहकार्य केले, याबाबत त्यांचे आभार. त्यांच्या सहकार्यामुळे केवळ माझ्याच मतदारसंघाला नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका मिळाल्या याचा आनंद आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना अधिक तत्परतेने उपचार मिळण्यास मदत होईल.