रुग्णवाहिका दिल्या, देखभाल-दुरुस्तीचं काय – आमदार सत्यजित तांबे जिल्हा परिषदांच्या अधिकाऱ्यांना पत्र तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

0
236

जामखेड न्युज——

रुग्णवाहिका दिल्या, देखभाल-दुरुस्तीचं काय – आमदार सत्यजित तांबे

जिल्हा परिषदांच्या अधिकाऱ्यांना पत्र तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

 

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकांची अवस्था अत्यंत बिकट असून त्यामुळे रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली. विशेष म्हणजे आमदार सत्यजीत तांबे यांनी याआधीच नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सरकार ग्रामीण भागांमध्ये रुग्णवाहिका पुरवतं. पण या रुग्णवाहिकांचा इंधन व देखभाल दुरुस्ती खर्च मिळत नसल्याने या रुग्णवाहिका बंद अवस्थेत पडून असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचंही आ. तांबे यांनी म्हटलं आहे.

बऱ्याचदा रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे खूप गरजेचे असते. त्यासाठी रुग्णवाहिकेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरू असताना वेळेवर उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचणे, म्हणजेच वेळेशी स्पर्धा असते आणि अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पण जर रुग्णवाहिकाच नादुरुस्त असेल, तर मात्र हा नक्कीच रुग्णांच्या जीवाशी खेळ ठरू शकतो, अशी भीती आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.

नंदुरबारसह पाचही जिल्ह्यांना सरकारने रुग्णवाहिका दिल्या होत्या. मात्र, यापैकी काही रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत धूळ खात पडल्या आहेत. परिणामी या पाचही जिल्ह्यांतील दुर्गम भागातील रुग्णांच्या वाहतुकीची व्यवस्था कोलमडली आहे. आ. सत्यजीत तांबे यांनी याआधीही १२ मे २०२२ रोजी तत्कालीन परिवहनमंत्र्यांसह पत्रव्यवहार केला होता. मात्र आता दीड वर्षांनी पुन्हा एकदा त्याच विषयावर पत्र लिहिण्याची वेळ आल्याची भावनाही आ. तांबे यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली. राज्यात ग्रामीण भागांमध्ये हीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध झालं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

याबाबत आ. सत्यजीत तांबे यांनी ३० ऑगस्ट रोजी पाचही जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या रुग्णवाहिकांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सेस निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here