गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेने बांधखडक शाळेत आजी-आजोबा मेळावा’ संपन्न प्रसिद्ध गायक संतोष कुलट यांची प्रमुख उपस्थिती

0
112

जामखेड न्युज——

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेने
बांधखडक शाळेत आजी-आजोबा मेळावा’ संपन्न

प्रसिद्ध गायक संतोष कुलट यांची प्रमुख उपस्थिती

 

 

आजी -आजोबा मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्यातील बांधखडक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ग्रामस्थांना संगीत मैफिलीचा अभूतपूर्व असा आस्वाद घेण्याचा योग जुळून आला.अहमदनगर येथील प्रसिद्ध संगीतकार व पार्श्वगायक संतोष कुलट यांच्या विविधांगी गायनाने व प्रसिद्ध तबलावादक शेखर दरवडे यांच्या सोलोवादनाने बांधखडकवासियांच्या कानामनाची तृप्ती झाली;तर नातवंडांनी केलेले आजीआजोबांचे पूजन पाहून डोळ्याचे पारणे फिटले. सुवर्णा मलमकर व पार्वती इनामदार यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली.

रविवार दि.10सप्टेंबर 2023 रोजी स.10:00 वा. शालेय प्रांगणात सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी आपापल्या आजी-आजोबांना लिहिलेल्या पत्रांचे तसेच विविध विषयांवर लिहिलेल्या उत्कृष्ट निबंधांचे प्रकटवाचन घेण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांचे गावातील आजी-आजोबा तर होतेच;परंतु विशेष म्हणजे आजोळकडील आजी-आजोबांची उपस्थितीसुद्धा मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रमातील नियोजन, सुसूत्रता, भव्यता, शिस्त, विद्यार्थ्यांचे सादरीकरण,ग्रामस्थांचे सहकार्य व व्यवस्थापन पाहून आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध गायक संतोष कुलट यांनी व्यक्त केली.

सदरचा आजी-आजोबा मेळावा हा बांधखडकचे ज्येष्ठ नागरिक तथा कृ.उ.बा.स.जामखेडचे माजी संचालक शांतिलालभाऊ वारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.शाळेचे मुख्याध्यापक विकास सौने यांनी प्रास्ताविकातून आजी-आजोबा मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला,तर मनोहर इनामदार यांनी मेळाव्यासाठी विविध प्रकारे सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी वारे,ज्ञानेश्वरी वारे,ऋतुजा वारे व प्रतिक्षा वारे या बांधखडक शाळेच्या माजी विद्यार्थीनींनी केले. कार्यक्रमास बांधखडक गावासह पंचक्रोशीतील अनेक शिक्षणप्रेमी नागरिक व तालुक्यातील शिक्षकबांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त एकनाथ चव्हाण व महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त लक्ष्मीकांत इडलवार यांचा शाळेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बांधखडकचे माजी सरपंच केशवअण्णा वनवे, विद्यमान सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तान्हाजी फुंदे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय वारे, सदस्य मंगेश वारे, अंकुश वारे, मारूती वारे, हर्षद वारे, नितीन वारे, प्रल्हाद वारे, रमेश वारे, बालाजी घोडके, प्रमोद वारे, जयकुमार वारे, पुणे रेल्वे येथील पोलीस उपनिरीक्षक मंगेश वारे, आजिनाथ कदम, अरविंद घोडके, अशोक कदम, रोहिदास वनवे, गणेश वारे, प्रशांत वारे आणि निलबाई पौडमल यांचे विशेष योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here