चोंडीतील उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी घेतली भेट!!!  आमदार प्रा राम शिंदे यांचा पुढाकार

0
88

जामखेड न्युज——

चोंडीतील उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी घेतली भेट!!!  आमदार प्रा राम शिंदे यांचा पुढाकार

 

भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्यात आले आहे. सदर अंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची बाब समोर येताच आमदार प्रा राम शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी बुधवारी सायंकाळी चोंडी येथे भेट दिली आणि अंदोलकांशी चर्चा केली. चोंडीतील अंदोलनाच्या मुद्द्यांचा अहवाल तातडीने सरकारला पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपासून महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस केल्यास संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला न्याय मिळू शकतो. आता नाही तर पुन्हा कधी नाही या भावनेतून यशवंत सेना व राज्यातील धनगर समाज आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचे शक्तीपीठ व ऊर्जाकेंद्र अशी ओळख असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्यात आले आहे. या अंदोलनाचा आजचा आठवा दिवस होता. या अंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच राज्यभरातील शेकडो धनगर समाज बांधव अंदोलनस्थळी भेटी देऊन अंदोलनास पाठिंबा दर्शवत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांडगे, आण्णासाहेब रुपनर, सुनील बंडगर, नितीन धायगुडे, समाधान पाटील, हे सर्वजण उपोषणाला बसले आहेत. या अंदोलकांची बुधवारी सायंकाळी 5 वाजता अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, उपविभागीय अधिकारी सायली सोळंके, डीवायएसपी वाखारे, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्या पथकाने भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी अंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे हेही उपस्थित होते. यावेळी उपोषणकर्त्या अंदोलकांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यावेळी त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले की, चोंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या अंदोलनाला आज भेट दिली. संसदेचे जे विशेष अधिवेशन होणार आहे. त्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने वटहुकूम काढावा अशी त्यांची मागणी आहे. अंदोलकांशी जी चर्चा झाली. त्या चर्चेतील मुद्दे आम्ही शासनाला आमच्या रिपोर्टमध्ये पाठवतो असं त्यांना आम्ही सांगितलं. त्याचबरोबर दोन अंदोलकांची तब्येत बिघडलेली आहे. त्यांना औषधोपचार घ्यावेत, ते नाकारू नये अशी विनंती केली. सनदशीर मार्गाने अंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाला पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. तसेच त्यांनी उपोषण स्थगित करावं अशीही विनंती केली. असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान, उपोषणकर्ते व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची चर्चा सुरू असताना अंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जो पर्यंत आमच्या हातात सरकार आरक्षणाचे पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत. मागील पंधरा दिवसांत एका ठिकाणी सुरू असलेल्या अंदोलनाच्या ठिकाणी अख्ख मंत्रीमंडळ जातं, पण धनगर समाजाच्या अंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं बाब अंदोलकांनी तीव्रतेने मांडली. आरक्षणासाठी आमचा प्राण गेला तरी बेहत्तर पण आम्ही मागे हटणार नाही. घटनेने दिलेले आम्हाला मिळालेच पाहिजे. जो पर्यंत सरकार आमच्या आरक्षणाचा निर्णय घेत नाही तोवर आमचे उपोषण सुरूच राहणार, आता आम्ही आर या पार लढाई सूरू केलीय, असे अंदोलकांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.

यावेळी आण्णासाहेब रुपनर, सुनील बंडगर
बाळासाहेब दोडतले माणिकराव दांडगे, नितीन धायगुडे, समाधान पाटील, किरण धलपे, शिवाजी तरवटे, लक्ष्मण उघडते,दत्ता,कोल्हे, सप्नील मेमाणे, अक्षय शिंदे, नंदु खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, सुनिल यादव, चेअरमन अशोक महारनवर, सह आदी उपस्थित होते.

दरम्यान, बुधवारी सकाळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करत चोंडीतील परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनात वेगाने हालचाली झाली. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या टीमसह चोंडीला भेट देऊन अंदोलकांशी संवाद साधला.

आमदार प्रा.राम शिंदे यांनी चोंडीतील उपोषणाच्या अंदोलनाचे गांभीर्य ओळखून तातडीने सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला. त्यांनी जिल्हा प्रशासनाला चोंडीत भेट देण्यास भाग पाडले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चोंडीला धाव घेत अंदोलकांशी चर्चा केली. चोंडीत उपोषणास बसलेल्या अंदोलकांशी केलेल्या चर्चेचा अहवाल जिल्हा प्रशासन तातडीने सरकारला पाठवणार असल्याने धनगर आरक्षणाच्या अंदोलनाची तीव्रता व राज्यातील धनगर समाज बांधवांच्या तीव्र भावना सरकारच्या निदर्शनास येणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या अंदोलनाचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात जाणार असल्याने चोंडीचे अंदोलन सरकारला गांभीर्याने घ्यावे लागणार आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणाचा वटहुकूम काढून महाराष्ट्रातील धनगर समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी चोंडी येथे उपोषण सुरू आहे. या अंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.

चौकटीसाठी

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चोंडीत उपोषणाचे अंदोलन करत असलेल्या दोघा अंदोलकांची प्रकृती बिघडल्यामुळे आमदार प्रा.राम शिंदे यांनी बुधवारी अंदोलकांची तातडीने औषधोपचार घेण्याची विनंती केली होती. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या विनंतीला मान अंदोलकांनी औषधोपचार घेण्यास सुरूवात केली. एका अंदोलकाला दिवसभर सलाईन लावण्यात आले. यामुळे अंदोलकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here