जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचा शाळाबाह्य नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर बहिष्कार, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
शिक्षक भरती नसल्याने निम्म्याने कमी असलेल्या शिक्षकांवर मुलांची शैक्षणिक जबाबदारी असताना प्राथमिक शिक्षण विभागाने शालाबाह्य अनियमित स्थलांतरित विद्यार्थी सर्वेक्षण, नवभारत साक्षरता कार्यक्रमातंर्गत निरक्षरांचे सर्वेक्षणावर जामखेड तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे.
याबाबतचे पत्र मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांना दिले आहे. एकीकडे शिक्षक भरती न करता, शिक्षकांवर अधिकची शालाबाह्य कामे करुन घेण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांना निवेदन देताना प्राचार्य श्रीकांत होशिंग, दशरथ कोपनर, आप्पा शिरसाठ, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी. टी. गायकवाड, भरत लहाने, प्रा. युवराज भोसले, प्रा. विनोद धुमाळ, सुग्रीव ठाकरे, मोहन यादव, मोहळकर सर, अनिल देडे, मुकुंद राऊत, विशाल पोले, समिंदर सर यांच्या सह अनेक शिक्षक उपस्थित होते.
सध्या शिक्षकांची भरती नसल्यामुळे प्रत्येक विद्यालयांमध्ये निम्मे शिक्षक कमी आहेत. घटक चाचणी परीक्षा जवळ असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकांना क्रमप्राप्त आहे. माध्यमिक विद्यालयांमध्ये सकाळी 9:30 वाजल्या पासूनच जास्त तासिका वर्ग सुरू असतात. त्यामुळे ही शाळाबाह्यकामे शिक्षकांना देऊ नये.
असे अनेक वेळा पत्र देवून देखील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्र काढले आहे. वास्तविक पाहता माध्यमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र ग्राह्य असते. त्यामुळे या पत्राचा विचार न करता संपूर्ण तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रात म्हंटले आहे.