जामखेड न्युज——
शाळाबाह्य नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर माध्यमिक शिक्षकांचा बहिष्कार!!!
शिक्षक भरती नसल्याने निम्म्याने कमी असलेल्या शिक्षकांवर मुलांची शैक्षणिक जबाबदारी असताना प्राथमिक शिक्षण विभागाने शालाबाह्य अनियमित स्थलांतरित विद्यार्थी सर्वेक्षण, नवभारत साक्षरता कार्यक्रमातंर्गत निरक्षरांचे सर्वेक्षणावर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. याबाबतचे पत्र मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना देण्यात आले.
तर एकीकडे शिक्षक भरती न करता, शिक्षकांवर अधिकची शालाबाह्य कामे करुन घेण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, प्रा. सुनील पंडित, उद्धव गायकवाड, बाळासाहेब भोर, किशोर मुथा, राम काटे, अमोल ठाणगे, राहुल झावरे, नंदकुमार शितोळे, आदिनाथ कोल्हे, प्रसाद शिंदे, पी.डी. तनपुरे आदींसह माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
शालाबाह्य अनियमित स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी परिपत्रक काढले आहे. संबंधित सर्वेक्षण हे 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट कालावधीत करण्याचे परिपत्रकात म्हटले आहे. संबंधित सर्वेक्षण झाल्यानंतर दररोज त्या विद्यार्थ्यांची लिंक भरण्याचे काम देखील शिक्षकांकडे सोपविण्यात आले आहे. तर नवभारत साक्षरता कार्यक्रमातंर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे देखील जबाबदारी देण्यात येत आहे.
सध्या शिक्षकांची भरती नसल्यामुळे प्रत्येक विद्यालयांमध्ये निम्मे शिक्षक कमी आहेत. घटक चाचणी परीक्षा जवळ असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकांना क्रमप्राप्त आहे. माध्यमिक विद्यालयांमध्ये सकाळी 9:30 वाजल्या पासूनच जास्त तासिका वर्ग सुरू असतात. त्यामुळे ही शाळाबाह्यकामे शिक्षकांना देऊ नये, असे अनेक वेळा पत्र देवून देखील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्र काढले आहे. वास्तविक पाहता माध्यमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र ग्राह्य असते. त्यामुळे या पत्राचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रात म्हंटले आहे.