जामखेड न्युज——
बलशाली राष्ट्रनिर्माणासाठी सशक्त भारत घडवूया-सुप्रिया कांबळे

स्वतःतील अंगभूत सामर्थ्य क्षमतांचा शोध घेत निरोगी आरोग्यपूर्ण समृध्द जीवन जगण्यासोबत तरुणाईने देशाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी एच.आय.व्ही./एड्स आणि संसर्गित व्यक्तींच्या हक्क अधिकारांसाठीचा आवाज बुलंद करून बलशाली राष्ट्रनिर्माणासाठी सशक्त भारत घडवूया असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक सुप्रिया कांबळे यांनी केले.राष्ट्रीय सेवा योजना,दिशा एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र ग्रामीण रुग्णालय व स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड महाविद्यालय जामखेड येथे त्या बोलत होत्या.यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम.एल. डोंगरे,स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान समन्वयक योगेश अब्दुले, प्रा.अविनाश फलके,डॉ.रंगनाथ सुपेकर,प्रा.मेघा कुलकर्णी उपस्थित होते.

पुढे बोलतांना कांबळे म्हणाल्या की;एच.आय.व्ही./एड्स बाबत तरुणांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक आहे.त्यासाठी स्नेहालय व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाच्या माध्यमातुन “होऊया सारे एक संघ,करूया एच.आय.व्ही./एड्स चा प्रतिबंध” ही सांघिकता निर्माण करून जाणीव जागृती करत आहे.एच.आय.व्ही./एड्स’चा प्रसार रोखण्यासाठी अतिजोखिमचे वर्तन असणारे भागांमध्ये जाणीव जागृतीचे काम करते आहे.महिला,बालकांच्या आणि एच.आय.व्ही.संसर्गित व्यक्तींच्या अधिकारांसाठी आग्रही भूमिका घ्यायला हवी.एच.व्ही./एड्स जाणीव जागृती करण्यासाठी तरुणाईने पुढे यायला हवे अशी सादही त्यांनी यावेळी तरुणाईला घातली.

यावेळी स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे योगेश अब्दुले, प्राचार्य एम एल डोंगरे आदींची भाषणे झाली.महाविद्यालयीन विद्यार्थी/ विद्यार्थिनींसाठी एचआयव्ही एड्स व लैंगिक आजारांविषयी योग्य माहिती देऊन त्यांच्या मार्फत महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती पर माहिती पोहोचवण्यासाठी न्याको नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत रेड रेबीन क्लब स्थापन करून जामखेड महाविद्यालय जामखेड राष्ट्रीय सेवा योजना विभागासोबत आर.आर.सी चे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रशिक्षणार्थी, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.विशाल रेडे,राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख अविनाश फलके,सूत्रसंचालन प्रा.तुकाराम घोगरदरे तर क्रिडा विभाग प्रमुख डॉ.अण्णा मोहिते यांनी आभार मानले.


