जामखेड न्युज——
जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थिनींना फटका
विद्यार्थिनींना एसटीची दोन ते तीन तास वाट पाहत अंधारात तीन ते चार किलोमीटर पायीच जावे लागते घरी
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या चांगल्या निर्णयाचा जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थीनींना फटका बसत आहे. दोन ते तीन तास बसची वाट पाहत शेवटी बस न आल्याने अंधारात मुलींना पायीच चार चार किलोमीटर अंतर जावे लागत आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात गुरुवारपासून (ता. १५) झाली आहे. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो. गुरुवार, शुक्रवार, शनिवार बसच नव्हती काल सोमवारी सकाळची बस आली सायंकाळी आलीच नाही. तसेच आज मंगळवारी सकाळी बस आली. सायंकाळी चार वाजल्यापासून श्री साकेश्वर विद्यालयातील पन्नास मुली बसची वाट पाहत बसल्या होत्या.
जामखेड एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर प्रमोद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता बस येईल म्हणून सांगितले व फोन बंद केला. यानंतर वाहतूक नियंत्रण थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले बस सुटली आहे. एक तास झाले तरी बस येत नाही म्हटल्यावर परत फोन केला तर ते म्हणाले बस येईल. मग वाहक चालक यांचा फोन नंबर द्या म्हटल्यावर फोन नंबर दिला पण त्या वाहक चालकाची ड्युटी दुसरीकडेच होती परत फोन लावला तर थोरात यांनी फोन बंद केला.
शेवटी सहा वाजले तरी बस येत नाही म्हटल्यावर शेवटी सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना अंधारात चाचपडत पायीच घरी जावे लागले. जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुलींना रात्री अंधारात घरी जावे लागत आहे. अधिकारी मात्र फोन बंद करून निवांत असतात. दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी तसेच नियमित बस सुरू करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा साकत, पिंपळवाडी, कडभनवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
जामखेड एसटी महामंडळाचा गलथान कारभार
वाहतूक नियंत्रक कक्षातील फोन बंद असतो.
अधिकारी खरी माहिती देत नाहीत.
बस येणार नसली तरी अधिकारी बस येईल म्हणून सांगतात. यामुळे मुलींना घरी जाण्यासाठी अंधार पडतो.
नेहमीच बस नादुरुस्त असतात.