Saturday, March 14, 2026
Home ताज्या बातम्या अरणगावच्या सहकारात ‘ठिणगी’! एकाच तंबूत दोन छावण्या; चेअरमनच्या ‘घरातून’ चालणाऱ्या कारभारावर स्वकीयांचेच...

अरणगावच्या सहकारात ‘ठिणगी’! एकाच तंबूत दोन छावण्या; चेअरमनच्या ‘घरातून’ चालणाऱ्या कारभारावर स्वकीयांचेच अस्त्र

0
6

जामखेड न्युज—–

अरणगावच्या सहकारात ‘ठिणगी’! एकाच तंबूत दोन छावण्या; चेअरमनच्या ‘घरातून’ चालणाऱ्या कारभारावर स्वकीयांचेच अस्त्र

राजकारणात ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी परिस्थिती निर्माण झाली की सत्तासंघर्ष कसा रंगतो, याचे जिवंत उदाहरण सध्या जामखेड तालुक्यातील अरणगावमध्ये पाहायला मिळत आहे. कै. सहकार महर्षी गोपाळराव सोले पाटील वि. वि. का. से. संस्थेतील अंतर्गत धूसफूस आता जिल्हा निबंधक कार्यालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, ज्यांनी तक्रारीचा शंख फुंकला आहे ते अर्जदार आणि ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, ते सर्व एकाच ‘राजकीय तंबूतील’ खेळाडू असल्याने गावाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

एकेकाळी खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवणारे व्हाईस चेअरमन प्रवीण मधुकर निगुडे आणि संचालक आयुब इब्राहिम शेख व प्रभू साहेबराव मस्के यांनी आता आपल्याच चेअरमनविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले आहे.

“सहकारात नियमांचा आदर व्हावा,” असा वरवरचा सूर असला, तरी यामागे सत्तेच्या चाव्या कुणाकडे असाव्यात, यावरून सुरू झालेला हा सुप्त संघर्ष आता उघड्यावर आला आहे. सन २०२१-२२ च्या निवडणुकीनंतर या संस्थेत ‘लोकशाही’ उरली नसून केवळ ‘मनमानी’ सुरू असल्याचा गंभीर आरोप या संचालकांनी केला आहे.

या प्रकरणातील सर्वात रंजक आणि धक्कादायक वळण म्हणजे संस्थेच्या दप्तराचा पत्ता! तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संस्थेचे कार्यालय हे केवळ नावापुरते उरले असून, चेकबुक, कीर्द आणि महत्त्वाची कागदपत्रे चक्क चेअरमनच्या वडिलांच्या घरी ‘कैद’ आहेत. इतकेच नाही, तर संस्थेचे प्रोसिडिंग बुक हे रात्रीच्या वेळी गुपचूप संचालकांच्या घरी नेऊन त्यांच्या सह्या घेतल्या जातात, असा खळबळजनक दावा अर्जात करण्यात आला आहे. ही ‘रात्रीची गुपिते’ आता चव्हाट्यावर आल्याने गावातील पारावरच्या चर्चांना ऊत आला आहे.

एका संचालकाच्या निधनानंतर कोणतीही रीतसर मीटिंग न घेता, नियमांना बगल देऊन चेअरमनने आपल्याच वडिलांची संचालक पदी वर्णी लावल्याचा आरोप, या वादात तेल ओतण्याचे काम करत आहे. “घरचा कारभार आणि संस्थेचा कारभार यातला फरक विसरला गेला आहे,” अशी बोचरी टीका आता गावात ऐकायला मिळत आहे.

सात दिवसात मीटिंग लावण्याची आणि दरमहा मासिक सभा घेण्याची मागणी करत, या त्रिकुटाने चेअरमनच्या सत्तेला थेट आव्हान दिले आहे.
एकाच गटातील या दोन गटांमुळे अरणगावच्या सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा निबंधक आता या अर्जाची दखल घेऊन ‘घरगुती’ झालेल्या या सहकार संस्थेला पुन्हा ‘कार्यालयीन’ शिस्त लावणार का, की हा वाद राजकीय तडजोडीने पडद्याआड मिटवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुर्तास, अरणगावच्या या ‘घरगुती’ राजकारणाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील चर्चेचे तापमान मात्र नक्कीच वाढवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!