Saturday, March 14, 2026
Home ताज्या बातम्या आश्वासन मिळाले, काम कधी सुरू होणार ? जामखेडकरांचा सवाल जामखेडच्या महामार्ग...

आश्वासन मिळाले, काम कधी सुरू होणार ? जामखेडकरांचा सवाल जामखेडच्या महामार्ग प्रश्नावर सभापती प्रा. राम शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष.

0
2

जामखेड न्युज—–

आश्वासन मिळाले, काम कधी सुरू होणार ? जामखेडकरांचा सवाल

जामखेडच्या महामार्ग प्रश्नावर सभापती प्रा. राम शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी वरील अतिक्रमण आणि रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाने आंदोलकांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही प्रत्यक्षात ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याने शहरात पुन्हा नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “लेखी आश्वासन मिळाले, काम कधी सुरू होणार? ” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील अतिक्रमण हटवून रखडलेले महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी तहसील कार्यालयासमोर दोन दिवस आमरण उपोषण तर दहा दिवस साखळी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला शहरातील नागरिक, व्यापारी तसेच विविध संघटनांनी मोठा पाठिंबा दिला होता.संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे यांनी देखील उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला होता.आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत अनेक बैठका घेतल्या आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

आंदोलनादरम्यान खासदार निलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट देत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना चांगलेच धारेवर धरत जामखेड येथे प्रत्यक्ष येऊन प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले होते. त्यानंतर अभियंता शेवाळे यांनी जामखेड येथे येऊन भुमिअभिलेख विभागाच्या मदतीने राष्ट्रीय महामार्गाची हद्द दि.२४ मार्चपूर्वी निश्चित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते.

लेखी आश्वासनानुसार पंचदेवालय मंदिर – कोठारी पेट्रोलपंप ते साकत फाटा या दरम्यान भुमिअभिलेख विभागाकडून महामार्गाची हद्द निश्चित करून त्यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाची गती दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
शहरातील या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

प्रशासनाकडून वारंवार बैठका घेतल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात काम मात्र पुढे सरकत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, या आंदोलनाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे आता या प्रश्नावर प्रा. राम शिंदे कोणती भूमिका घेतात, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करून जामखेड शहरातील महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कारवाई केली नाही, तर पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे जामखेडमधील राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!