दत्तवाडी शाळेत मातृसन्मान सोहळा व आरोग्य शिबीर संपन्न

0
194

जामखेड न्युज——

दत्तवाडी शाळेत मातृसन्मान सोहळा व आरोग्य शिबीर संपन्न

संघर्ष व असामान्य जिद्दीच्या यशोगाथा ऐकून महिलांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

६३ महिलांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला,तर बालचमूंनी खाद्य पदार्थांच्या विक्रीतून ७,५०० रू.ची कमाई केली.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणा-यांनी घडवले ‘मनाच्या श्रीमंतीचे’ अनोखे दर्शन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे बुधवार दि.८मार्च २०२३ रोजी मातृसन्मान सोहळा व महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले.

धोंडपारगावमधील वर्ग १ व २ चे अधिकारी,पी.एस.आय., पोलीस, डाॅक्टर्स, इंजिनिअर्स,शिक्षक,प्रगतशील शेतकरी असलेल्या तसेच धार्मिक,कृषी,औद्योगिक,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भूमीपुत्रांच्या मातांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जोडपे म्हणून समाजमाध्यमांनी गौरवलेले खामसवाडी ता.कळंब येथील सौ.सत्यभामा व श्री.आत्माराम सोनवणे ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत एन.टी.डी संवर्गातून राज्यात प्रथम आलेल्या सावरगाव ता.पाटोदा येथील श्री.संतोष खाडे यांच्या मातोश्री सौ.सरूबाई आजिनाथ खाडे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या मुलाचे एम.बी.बी.एस.करत असलेल्या जामखेड येथील सौ.बायजाबाई हराळ यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

आत्माराम सोनवणे यांनी जीवनातील दु:खांकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहावे व संकटातही सेवेतून पुण्याईची संधी कशी साधावी हा दृष्टीकोन समजावत स्वतःसह पत्नीने केलेल्या मजुरीतून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या लाखमोलाच्या दानांच्या घटना सांगताना उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

संतोष खाडे यांनी आपल्या ऊसतोड कामगार असलेल्या आई-वडिलांचे अतोनात कष्ट व असामान्य जिद्दीच्या ह्रदयस्पर्शी घटना सांगून महिलादिनानिमित्त माझ्या आईचा प्रथमच जाहीर सत्कार झाल्यामुळे जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण अनुभवत असल्याची भावना बोलून दाखवली.तसेच स्वतः उच्चपदस्थ अधिकारी म्हणून पदस्थापना झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील प्रत्येक कष्टकरी ,दीन,दलित,निराधार,वंचित व दिव्यांग महिला ही माझी आईच आहे ,या उदात्त भावनेने मी प्रशासकीय सेवा करीन असे सांगितले.तर बायजाबाई हराळ यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेचे महत्त्व सांगून सर्व माता पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावले.

यावेळी इंदिरा हाॅस्पिटल जामखेडच्या संचालिका डाॅ.पल्लवी सूर्यवंशी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाडळीच्या समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.जान्हवी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.याचा गावातील ६३ महिलांनी लाभ घेतला.
ग्रामीण भागातील महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि स्वतःसह पाल्यांच्या सुदृढ शरीर व निरामय जीवनासाठी आचरणात आणावयाच्या महत्त्वपूर्ण बाबी यांवर डाॅ.जान्हवी काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ,तर महिलादिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिरासह आर्थिक परिस्थिती दुर्बल असतानादेखील मनाच्या श्रीमंतीचे अनोखे दर्शन घडविणा-या महिलांच्या अनोख्या मातृसन्मान सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेतील शिक्षक व पालकवृंदांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे विविध स्टाॅल्स लावून बाल आनंद मेळाव्यात केवळ एक ते दीड तासांत तब्बल ७,५०० रू.ची कमाई करत व्यावसायिकतेचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोंडपारगावच्या सरपंच सौ.मनिषा औदुंबर शिंदे होत्या,तर उद्घाटक प्रदीर्घ काळ शासनाच्या आरोग्य विभागात सेवा केलेल्या प्राथमिक आरोग्य सेवा उपकेंद्र पाडळीच्या आरोग्यसेविका श्रीम.कलावती रोडे होत्या.प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनोहर इनामदार यांनी , तर आभार प्रदर्शन शाळेचे ज्येष्ठ व आदर्श शिक्षक हरिदास पावणे यांनी केले.बहारदार सूत्रसंचालन करून काकडेवस्ती शाळेचे मुख्या.श्री विजय जेधे यांनी तर ‘सावित्रीच्या लेकी आम्ही’ ही स्वरचित कविता सादर करून कु. अमृता बळीराम शिंदे हिने सर्वांची मने जिंकली.
अहमदनगर येथे वित्त व लेखाधिकारी असलेले श्री.गोविंद निवृत्ती शिंदे व आय.आय.टी.इंजिनिअर असलेले श्री.प्रणव बापू क्षीरसागर या गावच्या भूमिपुत्रांनी कार्यक्रमानंतर सर्वांना ‘मिष्टान्नभोजन’ दिले.
कार्यक्रमास नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.बाबासाहेब कुमटकर , धोंडपारगावचे शिक्षणप्रेमी ज्येष्ठ नागरिक गोकुळदास ढवळे,ग्रा.पं.सदस्य कैलास शिंदे ,कृषी अधिकारी विकास सोनवणे ,धोंडपारगावचे माजी सरपंच सुखदेव शिंदे,ग्रामविकास अधिकारी रामचंद्र शिंदे, तसेच खामसवाडी येथील प्रकाश जोशी,प्रशांत सुरवसे आणि ज्ञानेश्वर सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गावाचे नाव उज्ज्वल करणा-या भूमीपुत्रांच्या माता सौ.प्रभावती दिलीप शिंदे,श्रीम.मैना दत्तू शिंदे,श्रीम.ठकुबाई मोहन पवार,सौ.हिराबाई नागनाथ शिंदे,सौ.पद्मिनीबाई पांडुरंग मोरे,सौ.लता गोकुळदास ढवळे,सौ.छाया भुजंग शिंदे,सौ.कालिंदा धोंडिबा शिंदे,सौ.अंजनाबाई रामचंद्र जाधव,सौ.सत्यभामा भारत शिंदे,सौ.अक्काबाई नामदेव साळवे,सौ.शालन अप्पा शिंदे,सौ.कौशल्या बाळू शिंदे,सौ.सुरेखा गौतम शिंदे,सौ.द्रौपदी जालिंदर भांडवलकर,सौ.ठकुबाई अंकुश शिंदे,सौ.पुष्पा बिभीषण शिंदे,सौ.वर्षा कैलास शिंदे,सौ.गंगूबाई सुरेश धुमाळ व सौ.उषा चंद्रकांत शिंदे या मातांचा तर शालेय पोषण आहार योजनांतर्गत मागील 20 वर्षांपासून निष्ठापूर्वक व सचोटीने स्वयंपाकी म्हणून सेवा करत असलेल्या श्रीम.अरूणा रमेश औटे यांचा ‘अन्नपूर्णा’ सन्मानाने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशिलकुमार धुमाळ,उपाध्यक्ष मारूती सराफ ,ग्रा.पं.सदस्या अर्चना शिंदे , माता पालक संघाच्या सदस्या राणी धुमाळ यांच्यासह सर्व आजी-माजी विद्यार्थी व माता पालकांनी शिक्षकवृंदांस विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here