जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. आरोळे कोविड सेंटरचा दररोजचा खर्च मोठा आहे त्यामुळे परिसरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले होते यानुसार आज युवक क्रांती दल व झेप फौंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात भाजीपाला व किराणा साहित्य देण्यात आले.
रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. रजनीकांत आरोळे यांनी सुरू केलेला जामखेड (अहमदनगर) येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प आज चर्चेत आहे. सध्या डॉ. आरोळे यांचा मुलगा डॉ. रवी आरोळे आणि मुलगी डॉ. शोभा आरोळे हे या आरोग्य प्रकल्पाचं काम पाहतात. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आरोळे दाम्पत्य कोरोना चाचणीपासून ते रुग्णांवरील उपचारापर्यंत स्वतः लक्ष घालून काम पाहत आहेत. सद्यस्थितीत ‘आरोळे पॅटर्न’ हा चर्चेचा विषय आहे. राज्यात रेमडिसिविर आणि इतर औषधांचा तुटवडा आहे. मात्र आरोळे दाम्पत्याने आहे त्या साधनांचा सुयोग्य वापर करून रुग्ण बरे केले आहेत. कुठल्याही रुग्णांच्यामागे रेमडीसीवीर औषध घेऊनच या असा तगादा लावला नाही. कोविड सेंटरमधून तब्बल पाच हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आज ‘युवक क्रांती दल’ आणि ‘झेप फाउंडेशन’ यांच्यावतीने आरोळे रुग्णालयाला बटाटे, कांदे, कोबी, फ्लावर, चणाडाळ, तांदूळ, भेंडी, भोपळा, शेवगा, गवार असा आवश्यक भाजीपाला आणि धान्य देण्यात आले. यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, राशीन शहर अध्यक्ष विनोद सोनवणे, जामखेड मेडिकल असोसिएशनचे सचिन जाधव, प्रा. लक्ष्मण ढेपे (सर) प्रा. तुकाराम घोगरदरे, विनीत पंडित, विजय घोलप, अशोक नेमाने, अक्षय सोनवणे, विशाल रेडे, माऊली राळेभात, विवेक शिंदे उपस्थित होते. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी मिनीनाथ दंडवते आणि डॉ. शोभा आरोळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या कार्यासाठी दानशूर नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन युवक क्रांती दलाने केले आहे.