जामखेड न्युज——
Tik – Tok स्टार संतोष मुंडेंचा करंट बसुन मृत्यू
आपल्या हटक्या शैलीने नेटकऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विद्युत वाहक डीपीमधील फ्युज टाकत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने करंट लागून संतोष मुंडे यांच्यासह बाबुराव मुंडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष मुंडे हा फेमस टिक टॉक स्टार असून याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. भोगलवाडी (Beed) येथील संतोष मुंडे हा आपल्या मित्रांसह काळेवाडी येथील विद्युत वाहक डीपीमधील फ्युज टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक वीज पुरवठा सुरू झाला अन त्यामध्ये विजेचा करंट लागून या दोघांचा मृत्यू झाला.
तर आपल्या अनोख्या अंदाजाने टिकटॉक स्टार म्हणून राज्यभर परिचित झालेल्या संतोष मुंडे याच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. संतोष त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जायचा. संतोषचे लाखांवर फॉलोवर्स आहेत. अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो कायमच टिक टॉकवर व्हिडीओ तयार करायचा.
दरम्यान, संतोषच्या निधनाची बातमी कळताच पोलिसांनी भोगलवाडीकडे धाव घेतली. त्याच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सध्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहे. दरम्यान या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या संतोष मुंडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना, महावितरणने तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.