जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट.)
ऑनलाईन परीक्षा म्हणजे घरी बसून नाही तर त्यासाठीही परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. त्यामुळे जूनमध्ये का होईना ऑनलाईनऐवजी नेहमीप्रमाणे ‘ऑफलाईन’ परीक्षा घेणंच योग्य होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केली जाणार नाही. भविष्यात त्यांना अडचणही येणार नाहीत, असं मत आमदार रोहित पवार यांनी मांडले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करीत आहेत त्यामध्ये आमदार रोहित पवारांसोबतही त्यांनी चर्चा केली.
आमदार पवार म्हणाले, “शालेय शिक्षणमंत्र्यांनी आमदारांशी ऑनलाईन संवाद साधला. ही बाब प्रशंसनीय आहे. यावेळी आमदार पवारांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, मुलांची शाळा हेच त्यांचं परीक्षा केंद्र असेल त्यामुळं त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावं लागणार नाही. दरम्यान,परीक्षेपूर्वी या प्रक्रियेतील सर्वांचं लसीकरण करावं. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही केंद्र सरकारशी चर्चा करावी. निकाल वेळेवर लावण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
आजच्या परिस्थितीत परीक्षा घेणं ही केवळ शिक्षण विभागाची जबाबदारी नाही तर त्यासाठी इतर सर्व विभाग, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. या बाबत शिक्षणमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.
राज्यातील दहावी, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे, कारण करोना संक्रमणाची तीव्रता वाढत चालली आहे. परीक्षा रद्द करा, ऑनलाइन घ्या… अशा विविध मागण्या समाजातील सर्व स्तरातून होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांशी शुक्रवारी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ जारी करत त्यांनी बोर्ड परीक्षार्थी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. परीक्षांच्या आयोजनाविषयी, पर्यायी पद्धतीविषयी आम्ही संबंधित घटकांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले आणि विद्यार्थ्यांना तूर्त अभ्यास करत राहण्याचा सल्ला दिला.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘मला माहित आहे की तुम्ही चिंतेत आहात, तणावात आहात. कारण एकीकडे अभ्यास आहे आणि दुसरीकडे करोनाग्रस्तांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची याची तुम्हाला चिंता आहे. आम्ही संबंधित विविध लोकप्रतिनिधी आणि संबंधित सर्व घटकांशी चर्चा केल्या. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, चर्चा करत आहोत. मला तुम्हाला ही खात्री द्यायची आहे की विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे आणि त्याचबरोबर तुमचं शिक्षणही थांबू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही पुन्हा एकदा या विषयावर बोलण्यासाठी तुमच्यासमोर येणार आहोत. पण तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि सुरक्षित राहा.’