जामखेड न्युज——
नव्या भटके-विमुक्त महिला नेतृत्वाचे व्यवस्थेला रोखठोक सवाल!
समताभूमी, जामखेड येथे राज्यव्यापी भटके-विमुक्त महिला परिषद संपन्न
दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी “ग्रामिण विकास केंद्रा” च्या “समताभूमी”, जामखेड येथे “राज्यव्यापी भटके-विमुक्त महिला परिषद” पार पडली. कोरो संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ, खानदेश, मराठवाडा, प. महाराष्ट्र, मुंबई मिळून १२ संघटना मिळून महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांतील २४ तालुके, १२६ गावे, ४२०० हून अधिक कुटूंबांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीची पहाणी केली आहे. या समूहांचे अभ्यासक डॉ. लक्ष्मीलिंगम, टीआयएसएस., प्रा. डॉ. नारायण भोसले, मुंबई विद्यापीठ, आदी तज्ञांच्या सहाय्याने लवकरच अहवाल तयार होईल. हा अहवाल सरकारला समूह प्रतिनिधी सादर करणार आहेत. अभ्यासात सहभागी सर्व प्रमुख कार्यकर्ते, तज्ञ मंडळी, सुजाता खांडेकर-कोरो, महेंद्र रोकडे आणि सहकारी मिळून चर्चा, कार्यशाळा झाल्या. या प्रक्रियेतून ही महिला परिषद आयोजित करण्याचे ठरले होते. त्यासाठी ग्रामिण विकास केंद्र प्रमुख अरूण जाधव, उमाताई, बापू, द्वारकाताईंच्या नेतृत्वाखाली पारधी, कोल्हाटी, जमातींसह मोठी तरुण टिम राबत होती.
महिला परिषदेची वैशिष्ट्ये
अभ्यासात २४ जाती-जमाती असल्या तरी ४२ जमातींपैकी सुमारे ३० हून अधिक जमाती परिषदेत सहभागी झाल्या होत्या. सुमारे दोन हजारहून अधिक मोठा समूह परिषदेत सहभागी होता. मंगल खिंवसरा व माझ्या ४५ वर्षांच्या कालखंडातील महाराष्ट्रातील ही पहिली महिला परिषद, जेथे ७० टक्केहून अधिक मुला-बाळांसह स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या समूहांतील विद्यार्थी, युवती मोठ्या संख्येने होत्या. मुख्य म्हणजे कोणताही मोठा नेता, मंत्री, हिरो-हिरॉईन नसताना एवढी मोठी संख्या होती. याचे क्रेडिट राज्यातील १८ संस्थांसह कोरो टिम, ग्रा.वि.केंद्र, जामखेडला जाते.
कबीरांपासून-बसवेश्वर-तंट्या भिलपर्यंतचे विचार घेऊन व्यापक चळवळ उभी रहात आहे. अत्यंत छोट्या समूहांतील पारधी, वडार, डवरी गोसावी, मुस्लिम, घिसाडी, कोल्हाटी समाजातील नेतृत्व करणा-या तरुण, शिक्षीत महिलां प्रथमच शासकीय अधिका-यांसमोर घडाघडा, बिनधास्त बोलल्या. अन्यायी व्यवस्थेलाच त्या जाब विचारत होत्या!
कुठेही भावना, अश्रू नाहीत. त्यांनी घेतलेले जात पंचायतसह एकल महिलांचे अनेक कटू अनुभव-वेदना सांगितल्या. भटके-विमुक्तांची जातनिहाय जनगणना, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, मतदार कार्ड, रेशन कार्ड, मुला-मुलींना शिक्षण, महिलांवरील अत्याचार, आदी तातडीचे प्रश्न त्यांनी समोर आणले. यावर उपस्थित अधिका-यांनी ठोस आश्वासने दिली आहेत. राज्य निवडणूक अधिकारी यांनी तर स्वत:हून संबंधित विभागांमध्ये समन्वयाची जबाबदारी घेतली. वरील आश्वासने ही वैशिष्ट्ये म्हणून म्हणता येतील. प्रा. अंजली आंबेडकर यांनी व्हिडीओवरून वंचित बहुजन आघाडी कायम सोबत राहिल असे सांगितले. शाहीर शितल साठे, सचिन माळी यांनी जोशपूर्ण गाणी म्हटली.
खरा मुख्य प्रश्न घटनेतील मुलभूत अधिकारांसह अशा सकारात्मक अधिका-यांसह या सर्वांचा पाठपुरावा कसा करणार?