जामखेड महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांचे यश हाच शिक्षकांचा सर्वोच्च सन्मान -शशिकांत देशमुख

0
220

जामखेड न्युज——

माणसाच्या जडणघडणीमध्ये गुरुला महत्त्वाचे स्थान असते. आजच्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवण्याचे प्रमाण वाढले आहे. असे नुसते अनुकरण करणाऱ्या पीढीच्या डोक्यात -विचारात छत्रपती शिवाजी महाराज घालणे गरजेचे बनले आहे. आणि हे काम शिक्षकच करत असतात. चाणक्यासारखी सामान्याला असामान्य बनवण्याची क्षमता फक्त शिक्षकात असते. विद्यार्थ्यांचे यश हाच शिक्षकांचा सर्वोच्च सन्मान असतो. त्यामुळेच जगातील कोणत्याही चांगल्या घटनांची प्रेरणा शिक्षकच असतो. असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

जामखेड महाविद्यालय आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनिल नरके, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. देशपांडे मँडम, डॉ. गाडेकर तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षकाची भूमिका बजावत अध्यापन करत शिक्षण अनुभव घेतला.

यामध्ये सुशिल लोंढे -शारिरीक शिक्षण, शामल शेळके – कार्यालयीन अधिक्षक तर शैलेश्वर गीरी – विद्यार्थी प्राचार्य अशा वेगवेगळ्या पदांवर विद्यार्थ्यांनी काम केले. प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, बीबीए या वर्गातील विद्यार्थ्यांनी अधिक उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमात सर्व मान्यवर प्राध्यापक, कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयातील कर्मचारी श्री माने यांनी मैदानावर सापडलेले पाच हजार रुपये प्राचार्य नरके सर यांच्याकडे सूपूर्द करून संबंधित विद्यार्थ्यांला परत दिले गेले होते.

या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. भाकरे, प्रा. किंबहूने, प्रा. गाडेकर, प्रा. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. म्हस्के यांनी मानले तर सूत्रसंचलन प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी केले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here