जामखेड न्युज——एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार गद्दार असून, त्यांच्यात दम असेल त्यांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवावे असं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. त्यांच्या याच चॅलेंजला आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वीकारले आहे. आमदारकीचा राजीनामा देण्याची परवानगी मी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली असून, त्यांनतर निवडणूक लढवून जिंकून दाखवतो असे म्हणत सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचे चॅलेंज स्वीकारले आहे.

काय म्हणाले सत्तार…मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रीया देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, मला राजीनामा देण्याची परवानगी द्या अशी विनंती मुख्यमंत्री यांना मी केली आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा माहित पडेल आणि मला माझी जागा माहित पडेल. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी मला परवानगी दिली तर उद्या मी राजीनामा देणार आहे. पहिली निवडणूक लढवून त्यांना दाखवणार की, किती मतांनी निवडून येतो असे म्हणत सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचे चॅलेंज स्वीकारले. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तार यांना परवानगी देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलैला औरंगाबादेत…शिवसेनेत बंड केल्यानंतर आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलैला औरंगाबादेत येणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. तर यावेळी ते जिल्ह्याभराचा दौराही करणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले आहे. मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामुळे शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे.आदित्य ठाकरेंच्या शिवसवांद यात्रेला प्रत्युत्तर…दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा करत,बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली होती. त्यांच्या या यात्रेला तुफान गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले होते.त्यामुळे बंडखोर आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. म्हणूनच आता एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करत वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न बंडखोर आमदारांकडून केला जाण्याची शक्यता आहे.



