इंदूरहून पुण्याला जाणारी बस नदीत कोसळली! 13 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

0
225

जामखेड न्युज——

इंदूरहून अमळनेरला जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. दुर्दैवाने या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशच्या धारमध्ये कठडा तोडून ही एसटी बस नर्मदा नदीत थेट कोसळली. एस.टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला असून या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळल्याचे वृत्त असून यात ४० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण प्रवाशांपैकी 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे. तर अजून 20 प्रवासी बेपत्ता असल्याची चर्चा आहे. सध्या नदीत कोसळलेली एसटी बाहेर काढण्याचं काम सुरू असून, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. हा भीषण अपघात होण्यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, बस पुलावरून थेट खाली कोसळल्याने हा अपघात झाला. ही बस इंदूरहून पुण्याला निघाली होती.

 

इंदूर येथे नदीत पडलेली बस ही अमळनेर आगाराची असल्‍यासंदर्भात जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिला आहे. सदर बसवर चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक क्र. १८६०३) व वाहक प्रकाश श्रावण चौधरी (८७५५) हे होते. परंतु, त्‍यांच्‍याशी अद्याप संपर्क झालेला नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे.

मृतांच्या नातेवाईकांनामु ख्यमंत्री शिंदेंकडून १० लाखांच्या मदतीची घोषणा

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांता मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

बचावकार्य व्यवस्थित पार पाडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आणि सहकार्यासाठी विनंती केली. यादरम्यान त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे. “मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये बस बुडून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाला दिले आहेत”.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसंच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या आहेतत. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here