जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज—— (सुदाम वराट)
सध्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जामखेड शहरात रस्त्याची पुरती वाट लागली आहे. पुर्ण चाळणी झाली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सहा महिन्यात रस्त्याची पुरती वाट लागली आहे.

प्रशासनाने मोसमीपूर्व कामे नीट केली नसल्याचे पाऊस उघडकीस आणत आहे. नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम झालेले नाही. शहरात आठ दिवसापासून संततधार चालू आहे त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गासह बहुतांश लहान-मोठ्या रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे चिखल होत आहे. काही ठिकाणी पाणी साचून तळी झाल्याचे दिसत आहे. यातून वाट काढणे नागरिकांना कठीण होत आहे.काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडून महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते मात्र पहिल्याच पावसात रस्त्यावर ठिकाणी खड्डेच खड्डे पडून रस्ते होत्याचे नव्हते झाले आहे.

दळणवळणाच्या व नित्य वर्दळीच्या बीड नगर रस्त्यावर तर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा यक्ष प्रश्न उभा आहे.नगर रोड,बीड रोड,खर्डा रोड,जयहिंद चौक या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे पावसाच्या आगमनाने शहरातील या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालक, पादचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना या मार्गावरून वाट काढणे जिकिरीचे झाले आहे. दोन दिवसांपासून सुरु झालेल्या रिपरिप पावसाचा परिणामामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचा त्रास वाढला आहे.त्याच बरोबर रस्ते, नाले सफाई व स्वच्छता कामासाठी नगर परिषद फडं, आमदार, खासदार यांचा निधी येतो असतो. मात्र शहरात गटारी मुतारी, शाैचालयांची दयनीय अवस्था झालेली आहे. गटारी तुंडुब भरतात त्यामुळे गालिच्छ वातावरण तयार झाले आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाह आणि विसर्ग होण्यासाठी उपाययोजना पाहिजे तशा उपाययोजना नाहीत त्याच दृश्य पावसामुळे शहरात पहावयास मिळते. एखादा मोठा अपघात झाल्याशिवाय प्रशासनाला जागही येणार नाही.
नगर रोडवर चिखल व खड्ड्यांचा त्रास वाढला आहे.या रस्त्यावर पाय ठेवणे जिकिरीचे झाले आहे. वाहनांचे लहानसहान अपघात, विद्यार्थी व लोकांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे, असे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे जेरीस आले आहेत जामखेड ते सौताडा महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळून सहा महिने होत आले तरी अद्याप काहीच हालचाली नाही त्यामुळे नागरिकांनी रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण जेव्हा हाईल तेव्हा होईल, मात्र तत्पूर्वी रस्त्यावरील खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी केली आहे.तोपर्यंत म्हणाव काय रस्ता, काय खड्डे, काय जामखेड सगळं ओके. असे विनोदाने लोक बोलत आहेत