कमी गुण मिळतील या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या, मात्र मिळाले भरघोस गुण

0
221
जामखेड न्युज – – – – 
 दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळतील या भीतीने माढा तालुक्यात घोटी येथे एका विद्यार्थिनीने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र, जाहीर झालेल्या निकालात तिला ८१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याची माहिती पुढे आली असून, तिच्या आत्महत्येने घोटीत हळहळ व्यक्त होत आहे. अमृता दाजीराम लोंढे (वय १७, रा. घोटी, ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, १७ जून २०२२ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, अमृता लोंढे हिने एप्रिल २०२२ मध्ये दहावीचीपरीक्षा दिली होती. या परीक्षेत तिला अपेक्षेप्रमाणे गुण मिळतील की नाही याबद्दल तिला संशय होता. यामुळे ती सतत तणावाखाली होती, तसेच गुण कमी मिळाल्यास लोक काय म्हणतील या भीतीने ती वावरत होती. ही गोष्ट तिच्या आई-वडिलांनाही जाणवत होती. अशावेळी तिच्या माता-पित्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही.
गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास ती कुणालाही काही न सांगता ती घराबाहेर पडली. घरात ती दिसत नसल्याने नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; परंतु तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरापासून दोन किलोमीटर अंतरावर शिवराम मोहन लोंढे यांच्या शेतातील शेततळ्यात पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना निदर्शनास आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here