जामखेड न्युज – – –
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या हस्ते सायन्स सेंटरचे उद्घाटन बारामतीत होत आहे. यासाठी गौतम अदानी बारामतीत दाखल झाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) स्वत: अदानींच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. त्यांच्या गाडीचे सारथ्य रोहित पवार यांनी केले. सायन्स सेंटरच्या उद्घाटनासाठी अदानी आणि पवार एकत्र आले आहेत. राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे (Science and Innovation Activity Center) उद्घाटन आज होत आहे. त्यानिमित्त रोहित पवार, शरद पवार तसेच गौतम अदानी एकत्र आले आहेत. शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घघाटन होणार आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी
या सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत. यानिमित्ताने वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींचे फन सायन्स शो, स्टँडअप कॉमेडी, जादूचे प्रयोग, विज्ञान कार्यशाळा, अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मुलांसाठी असणार आहे. यासाठी राज्यभरातून जवळपास सहा हजार विद्यार्थी तसेच सहाशे शिक्षक यात सहभाही होतील.
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे सायन्स पार्क आहे. या सायन्स पार्कच्या उद्घाटनानिमित्ताने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनदेखील होत आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 36 जिल्ह्यातील 250 विविध वैज्ञानिक प्रकल्प सहभागी झालेत. राज्यभरातील 127 शाळांनादेखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहे.