जामखेड न्युज – – – –
नगर एमआयडीसीमधील एका गोदामातून लपवून ठेवलेला साडेसात टन रक्तचंदनाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या रक्तचंदनाची किंमत सुमारे सव्वातीन कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितलं की, एमआयडीसी परिसरातील सदाशिव झावरे यांच्या मालकीच्या गोदामात बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवलं असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार तेथे पोलिसांनी छापा घातला. मिळालेली माहिती खरी होती. गोदामात बटाट्याच्या गोण्यांखाली रक्तचंदन लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतले. त्याचे वजन साडेसात टन आहे. या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे तीन कोटी २५ लाख रुपये आहे. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ते जप्त केले.
या प्रकरणी तेथे असलेल्या एकाला ताब्यात घेण्यात असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या तस्करीत आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. यातील चार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे रक्तचंदन कोठून आणले, ते कोठे पाठवण्यात येणार होते, याचाही तपास करण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.