जामखेड प्रतिनिधी
प्रसिद्ध झालेल्या नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय मतदार यादीत मतदार नावांचा मोठा सावळा गोंधळ झाला आहे. मतदार राहतो एका ठिकाणी तर मतदान दुसर्या ठिकाणी आल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींची पडताळणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी असा प्रकार झाला असेल तर खोल मुळाशी जाऊन दोषींवर कारवाईची ग्वाही दिली आहे.
नगरपरिषद प्रारूप मतदार यादी दि. १५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली या मतदार यादीत एका प्रभागातील नावे दुसर्या प्रभागात समाविष्ट करण्याचे प्रकार झाले आहेत. याबाबत माजी नगरसेवकांनी आपले नातेवाईक व जवळचे मित्र प्रभागात घेऊन प्रभागात वर्चस्व निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न केल्याचा आरोप काही पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून होत असून स्पॉट पंचनामा करण्याची मागणी केली आहे.
जामखेडचे रहिवासी नसलेले तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याच्या तक्रारी आहेत. २२ फेब्रुवारी पर्यंत हरकती स्वीकारण्यात येत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हरकतीचा ओघ मुख्याधिकारी व प्रशासकाकडे सुरू झाला आहे. सर्व २१ प्रभागात अनेक तक्रारी सुरू झाल्या आहेत.
चौकट
काही तरूणांचे 18 वय वर्षे पूर्ण झाली आहेत निवडणूक शाखेकडे कागदपत्रे देऊनही अनेकांची नावे मतदार यादीत आलेली नाहीत. तसेच काही लोक राहतात एका प्रभागात व नावे मात्र दुसऱ्या प्रभागात आलेली आहेत. काही लोकांची नावे दोन ठिकाणी आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत साठी आपल्या गावी मतदान करतात व नगरपरिषदेला जामखेडला मतदान करतात. एकाच ठिकाणी नाव हवे काही पदाधिकारी यांनी मुद्दामच प्रशासनाला हाताशी धरून केले की काय अशी शंका उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने या दुरुस्त्या कराव्यात
संजय काशीद – शिवसेना तालुकाप्रमुख जामखेड
चौकट
प्रभागातील नावांचा गोंधळ झाला असेल तर हरकती नुसार स्थळ पाहणी करून मतदार संबंधित प्रभागातील आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येईल. असल्यास पुरावे घेण्यात येतील. मतदार ज्या प्रभागातील रहिवासी आहे त्या प्रभागात त्याचे नाव समाविष्ट करण्यात येईल. याबाबत मुळाशी जाऊन चौकशी केली जाईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
मुख्याधिकारी – मिनीनाथ दंडवते, जामखेड