राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द होण्याची दाट शक्यता

0
220
जामखेड न्युज – – – – 
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा असलेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम तुर्तास स्थगिती केला जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, सध्या हा दौरा स्थगिती करून भविष्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून अयोध्या दौऱ्याची नवी तारीख जाहीर केली जाऊ शकते. याबाबत मनसेकडून (MNS) लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे लवकरच मनसेच्या प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थवर पाचारण करून याबाबत माहिती देऊ शकतात. हा दौरा का स्थगिती करण्यात आला, याबाबत राज ठाकरे मनसेच्या नेत्यांमसमोर भूमिका मांडलीत. त्यानंतर राज ठाकरे स्वत:च अयोध्या दौरा तुर्तास रद्द झाल्याची घोषणा करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर गेले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने राज ठाकरे पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतले होते. अशातच आता अयोध्या दौराही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रकृती व्यवस्थित नसताना अयोध्येला जाण्याची दगदग राज ठाकरे यांना झेपेल का, याबाबत शंका आहे. त्यामुळे राज ठाकरे डॉक्टरांशी सल्लामसलत करून अयोध्येला जायचे की नाही, याबाबत निर्णय घेतील, असे सांगितले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मनसेने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची प्रचंड हवा केली होती. मात्र, आता हा दौराच रद्द झाल्यास मनसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. त्यामुळे राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका कशाप्रकारे मांडतात, हे पाहावे लागेल.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनीही कडाडून विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला होता. यासाठी ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही, अशी गर्जना बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा खडतर मानला जात होता. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याासाठी मनसेने जोरदार तयारी केली होती. शरयू नदीच्या काठावर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्लॅन मनसेने आखला होता. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी १० एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बूक करण्यासंदर्भातही बोलणी सुरु होती. मात्र, आता राज ठाकरे यांनीच प्रकृतीच्या कारणास्तव बॅकआऊट केल्यास मनसेची अयोध्या दौऱ्याची तयारी थंडावणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here