जामखेड न्युज – – – –
नगर महामार्गावरील जुने कायगाव (ता. गंगापूर) येथील गोदावरी नदीपात्रात वृद्ध पती-पत्नीचे मृतदेह शुक्रवारी (ता. २९) पाण्यावर तरंगताना आढळून आले. त्यापूर्वी त्यांनी दुचाकी बाजूला लावून चपलेवर नावे लिहिली. वैजापूर तालुक्यामधील खंडाळा येथील वृद्ध पती-पत्नी घरगुती किरकोळ वादामुळे रागातून जुने कायगाव येथील गोदावरी पुलावर पोचले. त्या ठिकाणी दुचाकी लावून, चपला पिशवी सोडून नदीमध्ये उड्या मारल्या. गुरुवारी (ता. २८) दुपारी दोन ते चारदरम्यान ही घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील गोरखनाथ हरिचंद्र गाडेकर (वय ६०) व लताबाई गोरखनाथ गाडेकर वय अंदाजे (५२) वर्ष हे पती-पत्नी दुचाकीवर बसून थेट गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका या ठिकाणी पोचले. तेथे चपला ठेवल्या, त्यावर नाव, गाव लिहून ठेवले. त्या ठिकाणी चष्मा, एक दुचाकी, पिशवी आढळली होती. शुक्रवारी सकाळीच गोदावरी नदी पात्र आणि परिसरात शोधकार्य मोहीम सुरू असतानाच नऊच्या दरम्यान गोरखनाथ गाडेकर यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.स्थानिक युवकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे नेण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा नदी पाण्यात बोट मशीनने शोध कार्य सुरू असताना दुपारी साडेबारादरम्यान लताबाई गाडेकर यांचा मृतदेह आढळला. त्यांचाही मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे नेण्यात आले. तेथे शविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.