कष्टाचं चीज झालं… बस स्टँडवर पाणी विकणारा अभिजीत बनला ‘RTO’

0
380
जामखेड न्युज – – – – 
 जिद्द व चिकाटीच्या जोरावर आमराईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या अभिजीत अनिल नरळे या तरुणाने एका महिन्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक व ज्युनिअर अभियंता अशा दोन पदांच्या परीक्षा पास केल्या आहेत. अभिजीत याचे वडील अनिल नरळे हे नरसिंग गिरणी मिलमध्ये काम करीत होते. गिरणी बंद पडल्यानंतर त्यांनी बसस्थानकावर पाणी बाटली विक्रीचा व्यवसाय सुरू केला. घरच्या हलाखीच्या स्थितीमुळे अभिजीत सुद्धा त्यांना या कामात मदत करायचा.
शिक्षणाची अडचण भागविण्यासाठी आईने कपडे, बांगड्या विक्रीचा व्यवसाय केला. यातून त्यांनी चार मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्याची एक बहीण एमटेक, तर दुसरी पुण्यात बँकेत नोकरी करीत आहे. अभिजीतने मेकॅनिकल इंजिनिअर पदवी घेतल्यानंतर तुळजापुरातील जलसंपदा विभागात नोकरी मिळाली. येथे पाच महिने नोकरी करून रेल्वेच्या लोको पायलट होण्यासाठी राजीनामा दिला. लोकोपायलटच्या सर्व परीक्षेत तो पास झाला; मात्र चष्मा असल्याने यातून त्याला बाहेर पडावे लागले. त्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यात २४७ गुण मिळवून सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून निवड झाली.
दरम्यान, यासोबतच अभिजीत याने केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शनची मुख्य परीक्षा दिली होती. यातही तो ज्युनिअर इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाला. फेब्रुवारी व मार्च अशा एक महिन्याच्या अंतराने त्याने दोन पदांवर यश मिळविले. आता सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्याच्या यशाने आई-वडिलांनाही आनंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here