आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात भटक्या विमुक्त जाती/जमाती समितीची भेट, विकासकामांची घेतली माहिती

0
253
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – – 
भटक्या विमुक्त जाती जमाती समिती 21 ते 23 एप्रिल या दरम्यान अहमदनगर जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राज्यातील 6 आमदार अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजाशी निगडित विविध विषयांवर अभ्यास करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आपल्या मतदारसंघात भेट द्यावी, असे आमंत्रण कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार यांनी या समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे यांना दिले होते. त्यांच्या विनंतीला मान देऊन VJNT समितीने जामखेड तालुक्याला भेट दिली. यावेळी समितीच्या हस्ते जामखेडमधील नव्याने बांधण्यात येणाऱ्या शाळेचे भूमिपूजन पार पडले.
शाळेच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात अतिथी असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमाती समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे, समितीतील काँग्रेसचे आमदार बळवंत मोरे, विधानपरिषद आमदार संजय दोंड व आमदार गोपीचंद पडळकर यांना घेऊन मतदारसंघातील खर्डा किल्ला येथे त्यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या स्वराज्य ध्वजाला भेट दिली. त्याचबरोबर नुकत्याच ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेल्या श्री संत सीताराम बाबा व श्री गितेबाबा देवस्थानाचे दर्शन घेऊन सर्व मान्यवरांनी चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांना दिली तसेच मतदारसंघात विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना पुरेपूर फायदा मिळवून देण्याचे व प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे ध्येय असल्याचे यावेळी बोलून दाखवले. अल्पसंख्याक समाजासाठी रोहित पवार मतदारसंघात करत असलेली अनेक विकास कामे त्यांनी या समितीसमोर सादर केली. याप्रसंगी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here