जामखेड न्युज – – – –
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या बलराम कुदळे (वय ४०) याने पत्नीसह आपल्या चार ५ वर्षांच्या मुलाची हत्या केली. तालुक्यातील गोंधवणी (दिघी शिवार) गावाच्या शिवारात ही धक्कादायक घटना आज (दि. १०) घडली. रामनवमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या डोक्यात कुदळीचे घाव घालून यमसादनी धाडल्यानंतर स्वतःच्या ५ वर्षीय मुलाला आंब्याच्या झाडाला फाशी दिली. विशेष म्हणजे या घटनांचे चित्रीकरण करून या नराधमाने पोलीस पाटलांसह ग्रामस्थांना पाठविले. यानंतर पोलिसांनी गतीने चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.
रामनवमीच्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने श्रीरामपूरसह जिल्हा हादरला. बलराम दत्तात्रेय कुदळे (वय ४० ) असे आरोपीचे नाव आहे. अक्षता बलराम कुदळे (वय ३५) मुलगा शिवतेज (वय ५ ) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कुदळे कुटुंबीय गोंधवणी गावात राहते. बलराम याचे त्याच्या आई-वडिलांशी पटत नव्हते. तो पत्नी व मुलासह शेतात घर बांधून राहत होता. त्यांच्यातही काही दिवसांपासून वाद होत होता. भांडणाला कंटाळून अक्षदा मुलासह काही दिवस माहेरी राहिली. नुकतीच ती पुन्हा आपल्या घरी आली होती. गेल्या सहा महिन्यांपासूनचा राग बलराम याच्या डोक्यात होता. पत्नी व मुलाची हत्या करण्याचा कट त्याने यापुर्वीच आखला होता.