जामखेड न्युज – – – –
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन काल अचानकपणे चिघळलं. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. एसटी कर्मचाऱ्यांनी चिथवण्याप्रकरणी अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं. त्यांनतर त्यांच्यावर आज न्यायालयात सुनावणी झाली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याप्रकरणी त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला केल्याप्रकरणी 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गुणरत्ने यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी पोलिसांनी केली होती. पंरतु न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची कोठडी दिली आहे.
राज्य सरकारची एसटी कर्मचाऱ्यांसोबत सुरूवातीपासून योग्य भूमिका नव्हती. त्यांच्या मागण्या सरकारने अद्यापही मान्य केल्या नाहीत. सदावर्तेनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत सरकार विरोधात भूमिका घेतली. त्यांच्यावर उच्च न्यायालयात हल्ला देखील झाला होता. त्यांनी अशा अनेक केसेस लढल्या आहे. असं सदावर्ते यांचे वकिल महेश वासनीस यांनी म्हटलं आहे.
न्यायालयाचा निकाल आला त्यात असे म्हटलं आहे की, गुणरत्ने सदावर्ते यांनी 7 तारखेला भडकावू भाषणं केलं आहे. परंतु त्या निकालात त्यांनी वापरलेले शब्द आणि गुणरत्ने सदावर्ते यांनी बोलल्या शब्दांमध्ये मोठी तफावत आहे. त्या निकालात शरद पवारांच्या बंगल्यातील भाषा घुसवण्यात आली आहे. असंही ते म्हणालेत. दरम्यान, आझाद मैदानावर 7 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांसमोर गुणरत्ने सदावर्ते यांनी धक्कादायक भाषणं केलं होतं. त्या भाषणांची चौकशी होणार, असं या अगोदर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत गुणरत्ने सदावर्ते यांना हे प्रकरण चांगलचं भोवणार असण्याची शक्यता आहे.