चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला गोडेतेलाकडे!!

0
233
जामखेड न्युज – – –
गेल्या काही दिवसांपासून गोडेतेलाच्या किंमतीत अचानक वाढ होत असून, आजघडीला तेलाचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे चोरट्यांनीसुद्धा आपला मोर्चा गोडेतेलाकडे वळवला आहे. दरम्यान, औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली (लिंबाजी) येथील किराणा दुकानासमोरून गोडेतेलाच्या टाक्या चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या पिशोर पोलिसांनी आवळल्या.
                            ADVERTISEMENT           
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील चिंचोली (लिंबाजी) येथील कैलास काथार व सलमान शेख यांच्या मालकीच्या किराणा दुकानासमोरून २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ९०० किलोग्रॅम वजनाच्या गोडेतेलाच्या ५ लोखंडी टाक्या (किंमत १ लाख ३६ हजार) व ३६० किलोग्रॅम वजनाच्या २ गोडेतेलाच्या लोखंडी टाक्या (किंमत ५० हजार ४००) अशा एकूण १ लाख ८६ हजार ४०० रुपये किमतीच्या गोडेतेलाच्या टाक्या चोरी गेल्या होत्या. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असताना एक सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सदरील चोरी ही पिकअप बोलेरो गाडीतून झाली असून सदरील गाडीवर निळ्या अक्षरात ‘ओके’ लिहिलेले असल्याचे फुटेज मिळाले. त्यानुसार तपासाची सूत्रे फिरवताच १३ मार्च रोजी धुळे जिल्ह्यात वर वर्णन केलेली बोलेरो पिकअप गाडीसह गोडेतेलाच्या टाक्या चोरणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली.
यानुसार, पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील पोलिसांच्या मदतीने गोडेतेलाच्या टाक्या चोरणाऱ्या टोळीतील शकील रफिक शेख ( रा. वल्लीपुरा, धुळे) व अस्लम इस्माईल खाटीक (रा. अंबिकानगर, धुळे) अशा २ आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप गाडी (एमएच १८ एए ५८३६) व ४ गोडेतेलाच्या भरलेल्या टाक्या पथकाने ताब्यात घेतल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here