जिल्हा शल्य चिकित्सकांनी जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयाची घेतली झाडाझडती, सत्तर टक्के अधिकारी कर्मचारी गैरहजर
ग्रामीण रुग्णालयासंदर्भात असलेल्या तक्रारी व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता जामखेड ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी ७० टक्के कर्मचारी अधिकारी उपस्थित नव्हते. उपस्थित कर्मचाऱ्यांनी अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले.
यावेळी डॉ. घोगरे यांनी सर्वांनी ओळखपत्र, ड्रेस कोड व वेळेचे बंधन न पाळणा-यांना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच त्यांनी नवीन उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.
जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खाजगी हॉस्पीटल असल्याने ते उपस्थित राहत नाही. रुग्णांना औषधे मिळत नसल्याने बाहेरून विकत घ्यावी लागतात वैद्यकीय अधिक्षक वेळेवर येत नाही तसेच कर्मचाऱ्यांत समन्वय नसल्याने नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने युवक नेते रमेश आजबे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिवशंकर वलांडे यांना घेराव घालून दिड तास जाब विचारला यानंतर तत्कालीन तहसीलदार गणेश माळी यांच्यासमोर वरीष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला. आठ दिवसांत ग्रामीण रुग्णालयाची परस्थितीत न सुधारल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता जामखेड ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश आजबे उपस्थित होते. आजबे यांनी ग्रामीण रुग्णालयाची परस्थिती समोर मांडली वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे डॉ. घोगरे यांच्या निदर्शनास आले. इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ सर्व अधिकारी कर्मचारी यांना फोन करून बोलावून घेतले होते या सर्वांची झाडाझडती घेऊन त्यांना कडक शब्दात समज दिली. कामात सुधारणा करून दर्जेदार सेवा देण्यास सुचवले.
यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय घोगरे यांनी नुतन उपजिल्हा रुग्णालयाची भेट घेऊन कामाची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिक्षक विष्णू मोराळे यांनी नुतन इमारत होईपर्यंत नगरपरिषद नवीन इमारत मिळावी अशी मागणी केली. आहे तेथेच दर्जेदार सेवा देऊन रूग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतील यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले व जे कर्मचारी अधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांना नोटीसा काढण्याचे बजावले.