फडणवीस लवकरच मुख्यमंत्री होणार – सुजय विखे

0
216
जामखेड न्युज – – – 
पारनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना जीवन उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ( Fadnavis to become CM soon: Sujay Vikhe’s claim )
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, राज्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हुकूमशहा असते तर चार राज्यात भाजपला कौल मिळाला नसता. चार राज्यात जे निकाल लागल्यानंतर येणाऱ्या 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असे चित्र आहे.
ते पुढे म्हणाले की, परस्परांचे घोटाळे झाकण्यासाठी राज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रवक्ते सध्यातरी महाराष्ट्राचे मनोरंजन करत आहेत. सरकारच्या कार्यपद्धतीमुळे हे पक्ष संपतील व पुन्हा एकदा राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल, असा आशावाद खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस एकाच माळेचे मणी आहेत. आपण सर्वजण मिळून भ्रष्टाचार करून जनतेचे वीज, पाणी व इतर प्रश्नांबाबत हाल करू, आपले सरकार जाणार नाही, याची काळजी घेऊ असे त्यांना वाटते. राज्यामध्ये किती आघाड्या होऊ द्या, मात्र जिल्ह्यामध्ये समविचारी पक्षांना व घटकांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 50 वर्षांपासून आमचे कुटुंब या प्रवृत्तीच्या विरोधात असून यापुढील काळातही राहील, असेही खासदार विखे म्हणाले.
चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले आहे. राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये सामील असलेला घटक पक्ष काँग्रेस माझ्या दृष्टीने संपला आहे. शिवसेनेने व राष्ट्रवादीने आपले कार्य जनतेसमोर मांडावे. पारनेर तालुक्याला दुष्काळ पाचवीला पुजला आहे. देशाचे व राज्याचे ज्येष्ठ नेते असणाऱ्यांनी दोन-तीन वेळा पारनेर तालुक्याचा दौरा केला. मात्र ते काही पारनेरचा पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत. त्यांच्यावर टीका करण्याएवढा मी मोठा नाही, पण जनतेचे प्रश्न त्यांनी व त्यांच्या पक्षातल्यांनी सोडवले पाहिजेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता खासदार सुजय विखे पाटलांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here