जामखेड न्युज – – – –
संपूर्ण क्रिडा विश्वाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्नचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. शेन वॉर्न यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथामिक माहितीनुसार शेन वॉर्न हे निधनसमयी थायलंडमध्ये होते. वैद्यकीय कर्मचार्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही शेन वॉर्नला वाचवण्यात अपयश आले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.
ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर शेन वॉर्न यांची ओळख होती. वॉर्नने भल्या भल्या महान क्रिकेटपटूंना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले होते. क्रिकेट जगातील इतिहासात शेन वॉर्न यांना महान बॉलरपैकी एक मानलं जातं. 1992 मध्ये ते पहिली टेस्ट मॅच खेळले होते आणि श्रीलंकाचे मुरलीधरननंतर 1000 आंतरराष्ट्रीय विकेट (टेस्ट आणि वनडे मॅच) घेऊन दुसरे बॉलर ठरले होते.
शेन वॉर्नची क्रिकेट कारकिर्द
शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने 37 वेळा 5 विकेट्स तर 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एका कसोटी सामन्यात 128 धावा देऊन 12 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. तर 194 वनडे मॅचमध्ये त्याने 293 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. वॉर्नची वनडेमधील 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.
दरम्यान, शेन वॉर्नने अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने संदेश लिहून रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले होते. वॉर्नने ट्विट करून युक्रेनचे समर्थन देखील केले होते आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचेही म्हटले होते.