जामखेड न्युज – – – –
दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, (जामखेड)चे अध्यक्ष श्री उध्दवराव देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती कालिंदीबाई देशमुख यांचे आज दुपारी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने देहावसान झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. जामखेड मधील अनेक प्रतिष्ठित नागरिक, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा/कॉलेजचे शिक्षक-प्राध्यापक-कर्मचारी, ब्राह्मण सभेचे सर्व सदस्य यांचे उपस्थितीत त्यांचेवर अग्निसंस्कार करण्यात आले.
जामखेड नगरपरिषदेचे सदस्य श्री अमित चिंतामणी, ल.ना.होशिंग (माध्यमिक) विद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांची या वेळी श्रद्धांजलीपर समयोचित भाषणे झाली.
त्यांचे दिवंगत पती स्वातंत्र्य सैनिक कै. मधुकाका देशमुख यांनी जो स्वातंत्र्य लढा दिला त्यात त्या अप्रत्यक्ष रित्या सहभागी असत. पती भूमिगत असताना स्वातंत्र्य सैनिकांना दर दहा पंधरा दिवसाआड शंभर-शंभर भाकऱ्या-पिठले पुरविण्याचे कार्य त्या सतत एक वर्षे करीत होत्या.
अत्यंत प्रेमळ, अजातशत्रू, सामाजिक कार्याची आवड असणारे, सश्रद्ध व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले.
त्यांचे पश्चात उद्धव, अरूण, लक्ष्मीकांत असे तीन पुत्र, तर वैजयंती मोहन बुवा या एक कन्या , सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.