जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कर्जत संपूर्ण राज्यभरात नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेमध्ये बोलत असताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर शरसंधान साधलं. तसेच ईडी या तपास यंत्रणेची तुलना थेट मजूर बीडीशी करत धनंजय मुंडे यांनी केंद्रीय तपास यंत्रणेची अक्षरश: खिल्ली उडवली. मजूर बिडीची किंमतही ईडीपेक्षा जास्त असल्याचं म्हणत ईडीची चव गेली असल्याचे धनंजय मुंडे यांनी भर सभेत बोलून दाखवले.
तसेच यावेळी बोलत असताना भाजप नेत्यांचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी बांडगुळ असा करत ओबीसी आरक्षणावरूनही भाजपवर निशाणा साधला आणि पूर्ण तपास तुमच्या कार्यकाळात झाला फक्त निकाल महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर लागला त्यात आमचा काय दोष असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्याचबरोबर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांचं कौतुक करताना बारा खात्याच्या मंत्र्यांना थेट आव्हान देऊन भाजपच्या किल्ल्यात तुम्ही आमदार झालात असा उल्लेख केला.
आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर गेल्या फक्त दोन वर्षात वीस वर्षांचा खड्डा पूर्ण केला असे देखील धनंजय मुंडे यांनी या सभेमध्ये बोलताना म्हटले आहे.





