कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि मंत्री धनंजय मुंडेंची जाहीर सभा 

0
327
जामखेड न्युज – – – – 
महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा दुहेरी सामना पाहायला मिळत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी ही निवडणूक लढवत आहे.
दिनांक 17 डिसेंबर, शुक्रवार रोजी कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत येथील फाळके पेट्रोल पंपाशेजारी ही सभा दुपारी ४ वाजता पार पडणार आहे.
दरम्यान, कर्जत नगर पंचायत निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्य तसेच देश पातळीवरील मोठे राजकीय नेते नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे येत असल्याने या सभेला मोठ्या प्रमाणात जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे हे कर्जतच्या जनतेला संबोधित करणार आहेत. तसेच या भव्य आणि जाहीर सभेची तयारीही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचं कर्जतमध्ये दिसून येत आहे. तसेच 21 तारखेला नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here