जामखेड न्युज – – –
कुटुंबाचा विरोध पत्कारून प्रेम विवाह करणाऱ्या आणि नव्याने संसार उभ्या करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना आजही कुटुंबाचा त्रास सहन करावा लागतो. यातून सैराट चित्रपटासारख्या भयावह घटना समोर येतात. मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावाने आपल्या बहिणीसोबत केलेलं हे कृत्य पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली असून, प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भावानेच सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. तो मूळचा गोयेगाव येथील रहिवासी आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे.
सहा महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह
कीर्ती उर्फ किशोरी अविनाश थोरे (वय 20 रा. गोयेगाव, ता. वैजापूर जि. औरंगाबाद) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. किर्तीने सहा महिन्यापूर्वी तिचा प्रियकर अविनाश संजय थोरे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाला किर्तीच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र प्रियकरावर जिवापाड प्रेम असल्याने किर्तीने आपल्या कुटुंबियांचा विरोध झुगारून पुण्यातील आळंदीत प्रियकर अविनाश सोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ते औरंगाबादेतील लाडगाव या परिसरात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच कीर्तीची आई शोभा संजय मोटे (वय 42) व तिचा धाकटा भाऊ संकेत संजय मोटे (वय 18 वर्ष 7 महिने) तिला भेटण्यासाठी लाडगाव शिवारातील वस्तीवर गेले होते.
धडापासून वेगळं केलं शीर
दरम्यान आपली आई आणि भाऊ आपल्याला भेटण्यासाठी आल्यामुळे कीर्ती आनंदात होती. तिने आईला आणि भावाला समोरील हॉलमध्ये बसण्यास सांगितले आणि ती चहा करण्यासाठी कीर्ती स्वयंपाकघरात गेली. तितक्यात तिच्यावर आई व भावाने पाठीमागून कोयत्याने मानेवर असंख्य वार केले. डोक्यात सैतान घुसलेल्या भावाने अक्षरश: तिचे शिर धडापासून वेगळे केले. रक्ताने माखलेले बहिणीचे शिर एका हातात धरून तो घराबाहेरील ओट्यावर आला व जोरजोरात तिला संपवले असे ओरडू लागला.
जॅकेटमध्ये लपवून नेला कोयता
दरम्यान बहिणीला भेटायला जाताना धाकट्या भावाने त्याच्या जॅकेटमध्ये धारदार कोयता लपवून नेला होता. कीर्तीच्या सासरचे लोक घरासमोरील शेतात कांदे लावण्याचे काम करत होते. प्रकृती ठीक नसल्याने तिचा पती बेडरूममध्ये झोपलेला होता. आई व भाऊ घरी आल्यामुळे आनंदी झालेली किशोरी त्यांना चहा करण्यासाठी स्वयंपाकगृहात गेली. त्याच वेळी तिच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या अविनाशवर या दोघांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तावडीतून सुटला.
ही थरारक घटना घडल्यानंतर बहिणीचे कापलेले शिर पायरीवर ठेवून मुलगा व आई वैजापूर पोलिस ठाण्यात दाखल झाले. खून केल्याची त्यांनी प्राथमिक कबुली दिली. त्यांच्यावर वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





