जामखेड न्युज – – –
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.
आज सकाळी गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. उद्योजक जाधव यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉललच्या माध्यमातून थेट संपर्क होता. त्याबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. उद्योजक जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार चंद्रकांत जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रात काम करत होते. मात्र 2019 साली त्यांनी काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवली. यामध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत पाहिल्यांदाच ते आमदार झाले.
चंद्रकांत जाधव यांचा शहरातील अनेक तालीम मंडळांशी चांगले संबंध होते. अल्पावधीतच त्यांनी अनेक कामांच्या माध्यमातून त्यांनी लोकांचा विश्वास प्राप्त केला होता. मात्र अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू केले होते. या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चंद्रकांत जाधव यांना यापूर्वी दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते ठणठणीत बरे सुद्धा झाले होते. मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 57 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने शहरासह जिल्ह्यातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.





