जामखेड न्युज – – – –
दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे बुधवारी राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. यामध्ये कोकण, मध्य- उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस झाला.
या पावसामुळे कांद्यासह आंबा, द्राक्षे, काजू आदी फळपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत राज्यात आणखी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तब्बल 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान खात्याने बुधवारी एकूण 17 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अरबी समुद्रात पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांसोबत मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण-पूर्ण गुजरात आणि मध्य प्रदेशच्या भागात तीव्र पावसाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असणार आहे. पण इतरत्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
येथे पडणार पाऊस
2 डिसेंबर : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर
3 डिसेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा. विदर्भातही तुरळक ठिकाणी बरसणार
चक्रीवादळाचा धोका
थायलंडमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालचा उपसागर व अंदमान समुद्रात आले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ४ डिसेंबरला आंध्रच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे.